राज्यपालांच्या निषेधासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना पोलिसांचा चकवा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा दौरा सुरळीत पार पडावा यासाठी सोलापूर पोलिसांनी गनिमी कावा वापरल्याचं आज पाहायला मिळालं. संभाव्य उग्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राज्यपालांना हेलिकॉप्टरने विद्यापीठात पोहोचवले. आंदोलकांना ही माहिती नसल्यानं रस्त्यावर धावणाऱ्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न झाला, पण ताफ्यात राज्यपाल नसल्यानं त्यांची निराशा झाली. असं असलं तरी शिवप्रेमींच्या संतप्त भावना त्यातून दिसून आल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीमाई फुले यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कोश्यारी यांच्या विरुद्ध राज्यभरात संताप व्यक्त होत असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. सोलापूर दौऱ्यावर येत असलेल्या राज्यपालांचा निषेध करण्यासाठी शिवप्रेमींनी जय्यत तयारी केली होती. मात्र, कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे स्वामी विवेकानंद केंद्र येथून विद्यापीठाकडे रवाना होताना पोलिसांनी नवी शक्कल लढविली. रिकामा ताफा सोलापूर विद्यापीठाकडे रवाना केला. त्यामुळं आंदोलकांनी सोलापूर-पुणे महामार्गवर या रिकाम्या ताफा रोखण्याचा प्रयत्न केला तसेच राज्यपालांच्या निषेधाच्या घोषणा ही दिल्या. मात्र, त्यात राज्यपाल नसल्याने आंदोलकांची निराशा झाली.
या आंदोलनापूर्वी राज्यपालांना जुळे सोलापूरकडे जातानाही भगवे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात आला होता. भगतसिंग कोश्यारी हे सोलापुरात हेलिकॉप्टरने सकाळी दहाच्या सुमारास पोहोचले. स्वामी विवेकानंद केंद्र, जुळे सोलापूर येथे ते आपल्या ताफ्यासह रवाना होताना, आसरा चौक येथे जात असताना, शेकडो शिवप्रेमींनी रास्ता रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दीड हजार पोलिसांच्या फौजफाट्याने या शिवभक्तांना रस्स्त्यावर येऊ दिले नाही. ताफा जात असताना आंदोलकांनी भगवे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करत निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यावेळी आसरा चौकातील आंदोलकांना अटक करण्यात आली. तरीही जुळे सोलापुरातील उद्घाटन समारंभ संपवून राज्यपाल हे सोलापूर विद्यापीठाकडे निघाले. त्यावेळी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून छुप्या मार्गाने राज्यपालांना हेलिकॉप्टरमधून विद्यापीठात नेले. त्यामुळं रिकामा ताफा रस्त्यावरून सोलापूर विद्यापीठाच्या दिशेने निघाला. सर्वांच्या नजरा रिकाम्या ताफ्याकडे होत्या. त्याचवेळी मडकी वस्ती येथे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी रिकाम्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत आडवण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीमाई फुले यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा हा निषेध होता. डीपीआयचे प्रदेश युवक अध्यक्ष सोहन लोंढे,जिल्हा युवक अध्यक्ष पृथ्वीराज मोरे आणि अजिंक्य रहाणे चांदणे या प्रमुख पदाधिकाऱ्यांना शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *