पदक जिंकल्यानंतर केले युद्धाचे समर्थन; खेळाडूला मिळाली मोठी शिक्षा
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज (मंगळवार) १३वा दिवस आहे. दोन्ही देशातील युद्धाचा परिणाम खेळावर देखील होत आहे. जिम्नास्ट इवान कुलियाकने रशियाकडून युद्धात वापरले जाणारे Z हे चिन्ह जर्सीवर लावले. यामुळे इवानवर तत्काळ बंदी घालण्यात आली. युक्रेनविरुद्धच्या रशियाने युद्धात सहभागी झालेल्या वाहानांवर Z हे चिन्ह लावले आहे. हे रशियाच्या युद्धाचे प्रतिक मानले जाते.
कतार येथे आयोजित एका स्पर्धेत इवानने कांस्यपदक जिंकले. पदक वितरण समारंभात जेव्हा इवान पोडियमवर आला तेव्हा त्याच्या जर्सीवर Z हे चिन्ह होते. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच लोकांना त्याचा विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय जिम्नास्टिक महासंघाने कुलियाकवर बंदी घातली. दोहा येथे झालेल्या स्पर्धेत इवान कुलियाकने केलेल्या कृतीने सर्वांची मान खाली घेतली आहे. यामुळेच त्याच्यावर ही कारवाई केल्याचे महासंघाने म्हटले आहे.
याआधी रशियाची टेनिस स्टार अँडी रुबवेलने एका सामन्यात विजय मिळवल्यानंतर कॅमेऱ्यावर नो वॉर प्लीज असे म्हणत युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला विरोध केला होता. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि लोकांनी तिचे कौतुक केले होते.रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर क्रीडा क्षेत्रातून त्यांना प्रचंड मोठा विरोध होत आहे. रशियाचे राष्ट्रपती पूतीन यांच्यावर आंतरराष्ट्रीय जुडो संघटनेने कारवाई केली होती. त्यानंतर फिफाने देखील रशियाच्या फुटबॉल संघाला या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपमधून बाहेर केले. युरोपमधील अनेक देशांनी रशियाविरुद्ध खेळण्यास नकार दिलाय.