आमचा महाराष्ट्र ‘दाऊदच्या कराची’समोर झुकणार नाही

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य करून पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले आहे. हा मोर्चा निघण्यापूर्वी आझाद मैदानात भाजप नेत्यांची भाषणं होणार आहेत. यावेळी नितेश राणे यांनी महाविकासआघाडीवर आगपाखड केली. यावेळी नितेश राणे यांनी म्हटले की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आज तुम्हाला याठिकाणी फक्त गर्दी करायला बोलावलेले नाही. आजच्या या मोर्चातून विधानसभेत बसलेले महाविकासआघाडीचे मंत्री, घरातून बाहेर न पडलेले मुख्यमंत्री आणि महाविकासआघाडीवर नागासारखे बसलेले शरद पवार यांच्यापर्यंत आपल्याला संदेश पोहोचवायचा आहे. तुम्ही आमच्या मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहाल तर भाजपचा कार्यकर्ता तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. नवाब मलिक या गद्दाराचा राजीनामा आम्ही का मागतोय? नवाब मलिक हा काही संत नाही. त्याने घरी पाठवलेल्या बिर्याणीत मसाला की टाकला म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागत नाही. तर नवाब मलिकने मुंबईवर हल्ला करणाऱ्या दाऊदबरोबर व्यवहार केला, त्याचे पैसे खिशात टाकले म्हणून आपण त्याचा राजीनामा मागत आहोत, असे नितेश राणे यांनी म्हटले.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचाच नाही, अशी ठाम भूमिका महाविकासआघाडीने घेतली आहे. त्यामुळे भाजपने आज मोर्चा काढायचे ठरवले आहे. पोलिसांनी या मोर्चाला आझाद मैदान ते मेट्रो चित्रपटगृहाच्या चौकापर्यंत जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र, भाजपचे कार्यकर्ते ऐनवेळी विधिमंडळाच्या दिशेने कूच करू शकतात. त्यामुळे पोलीस काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या कारवाईनंतरही ते मंत्रीमंडळात कसे असा प्रश्न फडणवीसांनी यावेळी विचारला होता. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपाने धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्च्यात भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *