सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा इशारा; कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

संपावर गेलेले एसटी कर्मचारी (workers) १० मार्चपर्यंत कामावर रूजू झाले नाही, तर कायमस्वरूपी नोकरीला मुकतील असा इशारा राज्य सरकारने दिला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांत ६८ चालक-वाहक कामगार रूजू झाल्याची माहिती राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने बुधवारी दिली.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य सरकारी सेवेत विलीनीकरण व्हावे, महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अन्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सर्व आर्थिक लाभ मिळावेत आदी मागण्यांसाठी चालक-वाहक दिवाळीपासून संपावर आहेत. त्यामुळे प्रवाशी वाहतूक व्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. चार महिन्यांत वारंवार आवाहन करूनही बहुतांश कर्मचारी अजून कामावर रूजू झालेले नाहीत. अशा कर्मचाऱ्यांनी १० मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे, असा अल्टिमेटम राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.

तोपर्यंत हजर झाले तर कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल, अशी ग्वाही परब यांनी गेल्या आठवड्यात दिली. परंतु, १० मार्चपर्यंत रूजू झाले नाहीत तर त्यांना नोकरी कायमची गमवावी लागेल, असा इशाराही दिला आहे. यापूर्वी अनेक कर्मचारी कामावर रूजू झाले असून त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांत नाशिक जिल्ह्यातही ६८ कर्मचारी कामावर रूजू झाल्याची माहिती महामंडळातील अधिकृत सूत्रांनी दिली.

शनिवारी (दि. ५) २० कर्मचारी कामावर रूजू झाले. रविवारी दोन, सोमवारी १७ तर मंगळवारी (दि. ८) १९ कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. गेल्या चार दिवसांत ६८ कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कामावर हजर होण्यास प्राधान्य दिले आहे. बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवसांत आणखी मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर हजर होतील, असा विश्वास एसटी महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

‘त्या’ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

एसटी कर्मचाऱ्यांचा (workers) हा संप अभूतपूर्व ठरला आहे. चार महिन्यांहून अधिक काळ तो सुरूच असल्याने पुन्हा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कामावर हजर होणाऱ्या चालक वाहकांना पुन्हा प्रशिक्षण देण्याचे सरकारचे निर्देश आहेत. त्यामुळे कामावर रूजू झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घ्यावे लागत आहे. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कामावर हजर करवून घेण्यात येत आहे. गेल्या महिन्यात १८० ते २०० बसच्या माध्यमातून प्रवाशांची वाहतूक सुरू होती. परंतु, हजर झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने बसची संख्याही वाढविण्यात आली आहे. सध्या २६० बस जिल्ह्यातील रस्त्यांवर धावत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *