विश्वचषक क्रिकेट स्पर्धा (महिला) -भारताची वेस्ट इंडिजवर मात

महाराष्ट्राची डावखुरी फलंदाज स्मृती मानधना (११९ चेंडूंत १२३ धावा) आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर (१०७ चेंडूंत १०९ धावा) या अनुभवी जोडीने झळकावलेल्या शतकांच्या बळावर भारतीय महिला संघाने शनिवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजला १५५ धावांनी नेस्तनाबूत केले. भारताने दिलेल्या ३१८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा डाव ४०.३ षटकांत १६२ धावांत संपुष्टात आला. या विजयासह भारताने अग्रस्थानी झेप घेतली. आता बुधवारी भारताची इंग्लंडशी गाठ पडेल.

प्रथम फलंदाजी करताना स्मृतीने कारकीर्दीतील पाचवे तर, हरमनप्रीतने चौथे शतक साकारले. या दोघींनी चौथ्या गडय़ासाठी १८४ धावांची विक्रमी भागीदारी रचली. त्यामुळे भारताने ५० षटकांत ८ बाद ३१७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजने बिनबाद १०० धावा अशी सुरुवात केली, परंतु फिरकीपटू स्नेह राणाने (३/२२) डिएंड्रा डॉटिनला (६२) बाद केले आणि विंडीजची घसरगुंडी उडाली. श्ॉमिलिया कोनेलला बाद करून राणाने भारताचा विजय साकारला.

झुलनचा विश्वविक्रम

महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत भारताच्या झुलन गोस्वामीने ४० बळींसह अग्रस्थान पटकावले. तिने ऑस्ट्रेलियाच्या लीन फुलस्टॉन यांच्या ३९ बळींच्या विक्रमाला मागे टाकले.

१८४ स्मृती-हरमनप्रीतने केलेली १८४ धावांची भागीदारी ही भारतासाठी विश्वचषकातील सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी थिरुष कामिनी-पूनम राऊतच्या २०१३च्या विश्वचषकातील १७५ धावांच्या भागीदारीला मागे टाकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *