जयसिंगपूर येथील डॉ.जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये जागतिक महिला दिन साजरा
जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टच्या व्हा.चेअरपर्सन ॲड.डॉ.सोनाली मगदूम उपस्थित होत्या. हातकणंगलेच्या पोलीस उपनिरीक्षक सौ. स्मिता बडे व कुरुंदवाड येथील यशस्वी उद्योजिका सौ.स्वाती अंबाडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
समानतेच्या कायद्याचा वापर मुली-महिलांनी फक्त स्वसंरक्षणासाठी न करता समाज उन्नतीच्या विस्तृत दृष्टिकोनातून या आयुधांचा वापर करावा असे प्र.प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले.
मुलींनी महाविद्यालयीन जीवनामध्ये जबाबदारीने वागले पाहिजे. प्रेम आणि तत्सम अनावश्यक गोष्टींकडे लक्ष न देता विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करुन आपले करियर घडविले पाहिजे, असे पोलीस उपनिरीक्षक सौ.सीमा बडे यांनी सांगितले. सौ.स्वाती अंबाडे यांनी माफक शब्दात आपला जीवन प्रवास उलगडून दाखवला. एक सामान्य गृहिणी ते यशस्वी हॉटेल उद्योजिका हा प्रवास सांगतानाच पौष्टिक,रुचीसंपन्न आहारासोबत त्याचे प्रेझेंटेशन,मांडणी योग्य असणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले व यशस्वी महिला उद्योजक होण्यासाठीचे मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थिनींनी वेगवेगळे खेळ, नृत्य, गायन, संगीत, नाट्य, इत्यादी कलाप्रकारातून स्त्रीशक्तीचा जागर सादर केला.प्लॅस्टिक कागद, कॅरीबॅग याचा वापर न करता कागदी पिशव्याचा वापर व्हावा या गोष्टींचा विचार करून विद्यार्थीनीकडून बनवल्या गेलेल्या कागदी बॅग जयसिंगपूर मधील मेडिकल दुकानामध्ये मोफत देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे आयोजन महिला विभागाच्या समन्वयक डॉ. एस. एम. अत्तार तसेच प्रा. सौ. पी. पी. बेलगली, प्रा. सौ. शहाणे, प्रा. सौ. लठ्ठे, प्रा. सौ. गुंडवडे व विद्यार्थिनी सदस्यांनी केले. संस्थेचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे, डिन स्टुडंटस् प्रा.पी. पी. पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.