रविंद्र जडेजाला मोठा धक्का!, आठवड्याभारातच पहिले स्थान गमावले
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी नवीन कसोटी क्रमवारी (ICC Test Ranking) जाहीर केली. ज्यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंना फायदा झाला आहे पण गेल्या आठवड्यातच पहिल्या क्रमांकापर्यंत मजल मारलेल्या रवींद्र जडेजाला फटका बसला आहे. जडेजा आता नंबर 1 कसोटी अष्टपैलू राहिलेला नाही. त्याचे स्थान वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरने हिसकावले आहे.
रवींद्र जडेजा ८ मार्च रोजी श्रीलंकेविरुद्ध मोहाली कसोटीत शानदार कामगिरी केल्यानंतर कसोटी क्रमवारीत नंबर-1 अष्टपैलू खेळाडू बनला. मात्र आठवडाभरातच त्याचे हे स्थान हिसकावण्यात आले आहे. आता रवींद्र जडेजा नंबर-२ कसोटी अष्टपैलू खेळाडू बनला आहे.बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या आयसीसी (ICC) क्रमवारीत रवींद्र जडेजाचे ३८५ तर वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरचे ३९३ रेटिंग आहे. जडेजा व्यतिरिक्त भारताचा रविचंद्रन अश्विन देखील या यादीत असून तो या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.वेस्ट इंडिजचा संघ सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. तिकडे जेसन होल्डरने आतापर्यंत एका सामन्यात ८२ धावा केल्या आहेत, तर तीन विकेट्सही घेतल्या आहेत. जर जडेजाबद्दल चर्च करायची झाल्यास तो श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
जडेजाने श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एक शतकी (नाबाद १७५) खेळीच्या जोरावर २०१ धावा केल्या. याशिवाय त्याने या मालिकेत दहा विकेट्सही पटकावल्या. विकेट्सच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
अष्टपैलू खेळाडू व्यतिरिक्त जर उर्वरित रँकिंगबद्दल बोलायचे झाल्यास जसप्रीत बुमराहने गोलंदाजांमध्ये मोठी झेप घेतली आहे. तो जगातील नंबर 4 चा गोलंदाज बनला आहे. बुमराहने पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी, न्यूझीलंडचा काईल जेमसन, टीम साऊथी आणि नील वॅगनर याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड आणि इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला मागे टाकले आहे.
विराटला फटका, श्रीलंकेच्या करुणारत्नेचा फायदा
श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने फलंदाजांच्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने १०७ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याचबरोबर विराट कोहलीची नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. पाकिस्तानचा बाबर आझम आठव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन अव्वल स्थानावर कायम आहे. जो रूट दुसऱ्या, स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या आणि केन विल्यमसन चौथ्या स्थानावर आहे.