नांदणीच्या बाळगोंडा पाटील- खंजिरे यांचा समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

नांदणी (ता. शिरोळ) येथील राजकीय, सामाजिक, सहकार, शेती, शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे बाळगोंडा आप्पा पाटील- खंजिरे यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन विश्वशांती समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले. विश्वशांती बहुउद्देशीय सेवा संस्था भारत, गोवा शाखेच्यावतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयभाऊ चौधरी आणि मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
बाळगोंडा पाटील-खंजिरे हे वयाच्या २१ व्या वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. नांदणी ग्रामपंचायतीचे ते दोन वेळा सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ते निष्ठावंत आणि क्रियाशील सदस्य आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन शेतकरी भाजीपाला संघ, जय किसान भाजीपाला संघ, जय किसान सहकारी पतसंस्था, नांदणी औद्योगिक वसाहत, नंदादीप शिक्षण प्रसारक मंडळ आदी संस्थांची स्थापना केली. नांदणी भाजीपाला व फळफळावळ उत्पादक सहकारी संघाचे संस्थापक संचालक, जवाहर सेवा संस्थेचे माजी चेअरमन, सुभाष दूध संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. हरोली हायस्कूल, क्रांती मित्र मंडळ, शेतकरी सहकारी दूध संस्था, जवाहर दूध व्यावसायिक संस्था आदी संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे. नांदणी कुरुंदवाड पूल, प्राथमिक आरोग्य केंद्र, जैन निशिदीका, अब्दागिरी रस्ता, धनगर समाज हॉल, ईदगाह मैदान कंपाउंड, नांदणी सुधारित नळपाणी पुरवठा योजनेतून पंपहाऊस व जलशुद्धीकरण योजना पूर्णत्वास आणण्यामध्ये मोठा हातभार त्यांनी लावला. बेघर वसाहतीमध्ये मजुरांना १४८ भूखंड मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
गेल्या वीस वर्षापासून त्यांनी पंचगंगा प्रदूषण मुक्ती आणि नांदणी ग्रामस्थांना वारणा नदीतून शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न केले असून तहसीलदार, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री अशा सर्व ठिकाणी निवेदने देऊन पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
त्यांच्या अशा विविध कामाची दखल घेऊन त्यांचा विश्वशांती समाजरत्न राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. बाळगोंडा पाटील खंजिरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडीत गणपतराव पाटील, नांदणी ग्रामीण पतसंस्था, शेतकरी भाजीपाला संघ, नांदणी बँक, नांदणी औद्योगिक वसाहत, अमृत सेवा संस्था, चकोते ग्रुप, पाटील समाज, जवाहर सेवा संस्था तसेच अनेक मंडळे, खासगी संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *