रोहित पवारांना शेतकऱ्यांनी दिला दणका

उजनी धरणाच्या ऊस पट्यातला आदिनाथ सहकारी साखर कारखाना ( adinath sahakari sakhar karkhana ) हा आता शेतकरी सभासदांनीचं चालवायचा ठरवलंय. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या सर्वसाधारण सभेत हा कारखाना बारामती अॅग्रोला भाड्याने देण्याचा ठराव रद्द करण्यात आलाय. बारामती अॅग्रोला देण्याचा ठराव रद्द करावा, ही मागणी २८२ मताने मंजूर झाली आहे. बारामती अॅग्रोच्या मागणीच्या बाजूने फक्त ३४ मते पडली. त्यामुळे हा कारखाना चालवू पाहणाऱ्या कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार ( rohit pawar ) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. १९ जुलै २०१९ ला वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक ९ प्रमाणे बारामती अॅग्रोला ( Baramati Agro ) आदिनाथ कारखाना भाड्याने देण्याचा ठराव झाला होता. आमदार रोहित पवार यांनी करार केल्यानंतरसुद्धा हा कारखाना दोन वर्षे बंद राहिला. यामुळे कारखान्यावर २० ते २५ कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा वाढला शिवाय दोन वर्षाचे १७ ते १८ कोटी रुपये वार्षिक भाडे मिळाले नाही. एकंदरीत कारखान्याचे ३५ ते ४० कोटी रुपयांचे नुकसान झाले. मुबलक ऊस उपलब्ध असताना हा कारखाना बंद असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेतातला ऊस पेटवून देण्याची वेळ आली. या सर्व प्रकाराला आमदार रोहित पवार जबाबदार असल्याचा आरोप करत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मागील सभेचे झालेले प्रोसिडिंग नाकारताना ठराव २७७ मतानी नामंजूर केला. यामुळे मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेला बारामती ॲग्रो कारखान्याला आदिनाथ भाड्याने देण्याचा ठराव आता रद्द झाला आहे.

यावर्षीच्या वार्षिक ऑनलाइन सभेत विषय क्रमांक १० बचाव समितीच्या विनंतीवरुन घेण्यात आला होता. या ठरावाला २८२ सभासदांनी होकार देऊन आपले स्वामित्व कायम ठेवले आहे. यापूर्वी मुंबईच्या राज्य सहकारी बँकेने आदिनाथ सहकारी साखर कारखाना सरफेस कायद्यांतर्गत ताब्यात घेऊन तो बारामती ॲग्रो लिमिटेड यांना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यास मान्यता देण्याचा विषय मांडण्यात आला होता. तो नाकारण्यात आला आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्त्वावर चालला पाहिजे ही काळाची गरज आहे, असे तालुक्यातील सभासदांनी म्हटले आहे. त्यासाठी आता सभासदांनीच रक्कम उभी करून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केलाय
हरिदास डांगे, डॉ. वसंतराव पुंडे, प्रा.रामदास जवळ, धुळाभाऊ कोकरे, महेश चिवटे आणि प्राचार्य जयप्रकाश बिले आदींनी कारखान्याचे चाक फिरून कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवून तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या भावी पिढीचे आयुष्य सुखकर करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *