“मी माझ्या कष्टाचा पैसा एका चोराला दिला याचं दु:ख वाटतं” – राजू शेट्टी

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरूड मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatna) एकमेव आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षप्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी याबाबत गुरुवारी घोषणा केली. देवेंद्र भुयार हे गेल्या कित्येक दिवसांपासून पक्षप्रमुखांच्या संपर्कात नव्हते. यासोबतच पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला येत नव्हते यावरून मतदारसंघातही त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर होता.

अखेर गुरुवारी हिवरखेड येथे पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षप्रमुख राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांच्या हकालपट्टीची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार म्हणून ते निवडून आले. दरम्यान आमदार देवेंद्र भुयार यांनी मंत्रिपदासाठी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे आग्रह धरला. मात्र मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक दिवसांपासून पक्षाच्या पहिल्या फळीतील नेते आणि देवेंद्र भुयार यांच्यामध्ये खटके उडत होते.

देवेंद्र भुयार यांच्यावर शेट्टी यांनी आपल्या भाषणात जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, ‘देवेंद्र भुयारबद्दल माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. तुम्ही शेतकऱ्यांचा घात केला असेल तर अशी घाण आमच्या संघटनेत राहू शकत नाही. आजपासून देवेंद्र भुयारचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी (Swabhimani Shetkari Sanghatna) संबंध नाही. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे’, अशी घोषणाही शेट्टी यांनी यावेळी केली.

देवेंद्र भुयार यांच्याबद्दल बोलताना राजू शेट्टी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. भाषणादरम्यान त्यांचे डोळेही पाणावले होते. शेट्टी पुढे म्हणाले ‘मी माझ्या कष्टाचा पैसा एका चोराला दिला याचं दु:ख वाटतं. मी माझं घर विकलेले पैसे या हरामखोराला दिले.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *