राजकारण गेलं चुलीत, महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे: फडणवीस

‘राजकारण गेलं चुलीत. मात्र, इथलं गव्हर्नन्स ठीक राहिलं पाहिजे. पण त्याला बट्टा लागतोय. ही अवस्था महाराष्ट्रानं कधीही पाहिली नव्हती,’ अशा शब्दांत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) हल्लाबोल केला. शनिवारी शिर्डी विमानतळावर आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शुक्रवारी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप झाला. या अधिवेशनात पहिल्या दिवसापासूनच फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली होती. महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं होता. ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’ टाकून सरकारला हादराही दिला होता. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट सामनाही रंगला. यामुळे हे अधिवेशन इतर कामकाजापेक्षा राजकीय कुरघोड्यांसाठीच गाजले.
या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘राज्यात जे काही सुरू आहे, त्यासंबंधी सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. वास्तविक पाहता मला राजकारणापेक्षा महाराष्ट्राची जास्त चिंता आहे. राज्यात सध्या ‘नो गव्हर्नन्स’ अशीच अवस्था पहायला मिळत आहे. अशी अवस्था राज्यानं कधीही पाहिली नव्हती. राजकारण जाईल चुलीत. महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे. येथील गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे. महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे, त्याला कुठेही बट्टा लागता काम नये, याची खरी काळजी करण्याची गरज आहे,’ असेही फडणवीस म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *