‘आप’चं सरकार स्थापन होताच केंद्राचा नवा नियम; अमित शहा
केंद्र सरकारनं (Central Government) चंदीगडमध्ये केंद्रीय सेवा नियम (Central Service Rules) लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केलीय. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी नुकतीच ही घोषणा केलीय. मात्र, पंजाबमध्ये याला कडाडून विरोध होत आहे. काल लोकसभेत पंजाबच्या अनेक खासदारांनी अधिसूचना जारी न करण्याची मागणी केली होती.चंदीगडमधील धनास येथील पोलीस (Police) गृहनिर्माण संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी शाहांनी केंद्रीय सेवा नियम लवकरच लागू होणार असल्याचं चंदीगड प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं. चंदीगड प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक गोड बातमी द्यायचीय, असं शाह म्हणाले होते. चंदीगड (Chandigarh) प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती केंद्राच्या सेवा नियमांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळं कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असून याचा लाभ आता प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.आता निवृत्तीचं वय 58 ते 60 वर्षे असेल. त्याचबरोबर शिक्षण विभागाशी संबंधित सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं निवृत्तीचं वय 65 असणार आहे. तर, प्राध्यापकांचं सेवानिवृत्तीचं वय 60 ते 65 वर्षे असेल, असं त्यांनी जाहीर केलंय. त्याचबरोबर शिक्षकांना प्रवास भत्ता, दरमहा सुमारे 4000 रुपयांपर्यंत वेतनश्रेणी मिळणार आहे. तसेच महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपनासाठी दोन वर्षांची रजाही मिळणार आहे.