….मला काळजी वाटतेय’; शरद पवारांनी सांगितला उपाय

पाणी दिसलं की आपण ऊस लावतो, पण आता नवीन विचार करावा लागेल. ब्राझील, अमेरिका सारख्या देशात इथेनॉल वापर जास्त करतात, आपल्याला देखील तसा विचार करावा लागेल. केवळ उसापासून साखर असा विचार करून चालणार नाही, इथेनॉलकडे (Ethanol) वळलं पाहिजे, असे राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. आज शिराळा येथे भाजप नेते, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

आजच्या दिवशी आनंदाची गुढी उभा करून आपण सगळे इथे आलात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभारलेली विकासाची गुढी भक्कम करण्यासाठी आपण आलात. योग्य असेल तर पाठींबा द्यायला आणि योग्य नसेल तर वेगळी भूमिका घ्यायला हा भाग कधी मागे पडला नाही. स्वातंत्र्य लढ्यात या भागाचं खूप मोठं योगदान आहे. शिवाजीराव हे यशस्वी जि.प अध्यक्ष होते, राज्यात ते अग्रभागी असत. शेती, उद्योग अशा विविध विभागात त्यांनी काम केलं आहे. आज शिवाजीराव नाईक पुन्हा घरी परतत आहेत, त्याचा मला आनंद आहे. शिवाजीराव नाईक यांच्या कामाचा राज्यातील सर्व भागात उपयोग करून घेतला पाहिजे. या भागातील जवळपास सर्व प्रश्न सुटत आलेले दिसत आहेत, याचा आनंद आहे.

मात्र, उसाची शेती इतकी वाढली आहे की, मला याची काळजी वाटते. जवळपास मे अखेरपर्यंत साखर कारखाने सुरू राहतील असं दिसतंय.पाणी दिसलं की आपण ऊस लावतो, पण आता नवीन विचार करावा लागेल. ब्राझील, अमेरिका सारख्या देशात इथेनॉलचा वापर जास्त करतात, आपल्याला देखील तसा विचार करावा लागेल. केवळ उसापासून साखर असा विचार करून चालणार नाही, इथेनॉलकडे (Ethanol) वळलं पाहिजे. साखरेच्या कर्जाचे व्याज कारखान्यावर येतं, त्यामुळे वेगळं काही करता येत का, हे पहावं लागेल, असे ते म्हणाले.

आज देशाचं राजकारण वेगळ्या दिशेनं जातंय. मात्र, हे राज्य वेगळा विचार करणाऱ्यांच्या हातात आहे. धर्माच्या नावाने देशात अंधकार पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देश घडवणाऱ्यांचा आदर करायचं सोडून टीका टिपण्णी केली जातेय. व्यवसाय चांगला करत असेल तर कुणीही व्यवसाय करू शकतो. पण हा अमुक एका धर्माचा म्हणून त्याच्याकडून माल घ्यायचा नाही, अशी भूमिका देश पुढे घेऊन कसा जावू शकेल. धर्मांध शक्तींच्या विरोधात देखील आपल्याला काम करावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आदी मान्यवर यांच्या प्रयत्नातून राज्याचा विकास केला जात आहे, असेही पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *