कराडमध्ये होणार पश्चिम महाराष्ट्रातील पहिले ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर

तालुक्यातील वराडे येथे वन्यजिवांवर उपचार (treatment) व देखभाल करण्यासाठी अत्याधुनिक असे ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर म्हणजे वन्यजीव उपचार केंद्र मंजूर करण्यात आले आहे. यासाठी प्राथमिक अंदाजपत्रकानुसार सात कोटी 58 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या केंद्रासाठी आणखी निधीची आवश्यकता भासल्यास निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वन्यजीव उपचार केंद्र मंजूर करण्याची मागणी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शासनाकडे केली होती. त्या अनुषंगाने या केंद्रासाठी राज्य शासनाने सात कोटी 58 लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अत्याधुनिक उपचारपद्धतीने सुसज्ज असे ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर मंजूर झाले असून, कोल्हापूर, सांगली व कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील वन्यजिवांना लवकरात लवकर उपचारांसाठी व देखभालीसाठी वराडे येथील उपचार केंद्रात आणता येणार आहे.

जंगलात वावरणाऱ्या वन्यजिवांना पाळीव जनावरांच्या दवाखान्यात उपचार केल्यास पाळीव जनावरांच्या रोगांची लागण होऊ शकते. त्यामुळे या वन्यजिवांसाठी वेगळे उपचार (treatment) करण्याची गरज भासते. वन्यप्राण्यांवर उपचार करताना कमीत कमी मानवी संपर्क व तातडीने उपचार करून लवकरात लवकर त्यांना मूळ अधिवासात सोडणे आवश्यक असते. या दृष्टीने आवश्यक उपचारपद्धती जसे की, रेडिओथेरपी, पोर्टेबल एक्स-रे यांसारख्या अद्ययावत सुविधांनी हे उपचार केंद्र सुसज्ज असणार आहे. या उपचार केंद्रांमध्ये मांसभक्षी प्राणी-पक्षी, तृणभक्षी प्राणी-पक्षी व जलचर प्राण्यांसाठी वेगवेगळ्या पिंजऱयांची व्यवस्था करण्यात आली असून, या ठिकाणी त्यांना आवश्यक असणाऱया नैसर्गिक अधिवासाशी मिळतेजुळते असे वातावरण तयार करण्यात येणार आहे, असेही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली असणाऱया राज्य कॅम्पा योजनेतून हा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे हे वन्यजीव उपचार केंद्र उत्कृष्ट दर्जाचे व अत्याधुनिक साहित्याने परिपूर्ण असणारे आहे. या कामी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, मुख्य वनसंरक्षक एम. रामानुजम, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, नाना खामकर यांनी सहकार्य केले आहे.

ढेबेवाडी वनपरिक्षेत्र कार्यालय स्थलांतरित करू नका

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथे वनपरिक्षेत्र (वन्यजीव) कार्यालय ब्रिटिशकाळापासून कार्यरत आहे. हे कार्यालय ग्रामस्थ, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोयीचे मध्यवर्ती ठिकाण आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वनपरिक्षेत्राची पुनर्रचना करण्यात येत असून, त्यात ढेबेवाडी वनपरिक्षेत्राचे कार्यालय हे शिराळा तालुक्यातील मणदूर येथे स्थलांतरित होणार आहे. मात्र, हे कार्यालय स्थलांतरित झाले तर कर्मचाऱयांना गैरसोयीचे होणार आहे. त्यामुळे ढेबेवाडी येथील परिक्षेत्र कार्यालय (वन्यजीव) स्थलांतरित करू नये, अशी सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांना पत्राद्वारे कळविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *