जयसिंगपूरच्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार
जयसिंगपूर येथील येथील एका महिलेला एजंटांनी पुण्यात आणले, पैशांचे आमिष दाखवून तिची किडनी (kidney) काढली आणि ती अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपितही केली… पुण्यातील एका रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर एजंटसोबतचा आर्थिक व्यवहार फिसकटल्याने संबंधित महिलेने त्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आणि त्यानंतर हा तस्करीचा प्रकार उजेडात आला. दरम्यान, रुग्णालयानेही या प्रकरणाबाबत पोलिसांत धाव घेत महिलेविरोधात तक्रार दिली आहे.
सारिका गंगाधर सुतार ही महिला जयसिंगपूर येथे राहते. तेथे ती हॉटेलमध्ये चपात्या लाटून आपल्या दिव्यांग मुलासह दोन मुलांना सांभाळते. पतीने काही वर्षांपूर्वीच तिची साथ सोडली आहे. तिच्या डोक्यावर कर्ज असल्याने व मुलांच्या भविष्याच्या चिंतेने ती सतत तणावात असायची. याच दरम्यान वर्षभरापूर्वी तिला एक महिला भेटली तिने तिची पैशांची गरज ओळखून रवीभाऊ नावाच्या एंजंटाची ओळख करून दिली.
या एजंटने तिच्यासमोर पैशांच्या बदल्यात तिची किडनी (kidney) पुण्यातील साळुंके नावाच्या व्यक्तीला विकण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यातून तिला 15 लाख रुपये मिळतील, असे आश्वासन दिले; तसेच ‘एका किडनीवरही तू जिवंत राहू शकतेस’ असे सांगितले. 15 लाख रुपये मिळणार म्हणून सारिकानेही किडनी देण्यास होकार दर्शविला. त्यानंतर वर्षभरापासून संबंधित महिला पुण्यात येत होती. तिच्या रक्ताचा गटही किडनी आवश्यक असलेल्या साळुंके नावाच्या व्यक्तीसोबत जुळला. किडनीचा हा तोंडी व्यवहार एजंटमार्फत झाला होता.