खिद्रापूर मंदिराच्या कामाबाबत जिल्ह्याचे तिन्ही मंत्री अपयशी

खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिराची दुरवस्था झाली असून हे शिल्पवैभव म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा ऐतिहासिक ठेवा आहे. जिल्ह्याला तीन मंत्री असून ते आश्वासनाची नुसती खैरात करत आहेत. ते मंदिराच्या कामाबाबत अपयशी ठरल्याची घणाघाती टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. या शिल्पवैभवाच्या जीर्णोद्धारासाठी केंद्रीय पर्यटनमंत्र्यांची भेट घेऊन निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

मंदिराच्या दुरवस्थेबाबत पुरातत्त्व विभागही ‘गांधारी’ची भूमिका घेत आहे. याबाबत ते कोणतेही गांभीर्य घेत नसल्याचा आरोप करत यांचीही तक्रार करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. ‘खिद्रापुरातील कोपेश्वर मंदिराचे शिल्पवैभव संकटात’ अशी वृत्तमालिका दैनिक ‘पुढारी’ने प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची दखल घेत शेट्टी यांनी शुक्रवारी या मंदिराची पाहणी केली. यावेळी सरपंच हैदरखान मोकाशी, ग्रामविकास अधिकारी आप्पासाहेब मुल्ला, पोलिसपाटील दीपाली पाटील यांनी मंदिराच्या झालेल्या दुरवस्थेची माहिती दिली.शेट्टी म्हणाले, 2019 आणि 21 च्या महापुरानंतर खरोखरच खिद्रापूरचे शिल्पवैभव संकटात आले आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाने तत्काळ दुरुस्तीचा आराखडा तयार करून केंद्रीय मंत्रालयाकडे सादर करावा. मंदिराचे मजबुतीकरण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यावेळी सौरभ पाटील, सचिन पाटील, अभिनंदन सुनके, दस्तगीर जमादार, हिदायत मुजावर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *