भाजप नेते गणेश नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

भारतीय जनता पक्षाचे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता गणेश नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांकडून (Navi Mumbai Police) गणेश नाईक यांचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर नवी मुंबई पोलिसांकडून गणेश नाईक यांचा विविध ठिकाणी शोध घेण्यात येत आहे. पोलिसांच्या टीमकडून गणेश नाईक यांच्या शोधासाठी टीम्स तयार केल्या असून या टीमकडून नवी मुंबई, मुरबाडमधील फार्म हाऊस तसेच इतर परिसरात त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

या प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सुद्धा घेतली. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात योग्य ती करावाई करण्याच्या सूचना सुद्धा केल्या होत्या. दुसरीकडे नवी मुंबईतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनीही गणेश नाईक यांच्याविरोधात आंदोलन करत अटक करण्याची मागणी केली आहे.

‘गणेश नाईकांची DNA चाचणी करा’, पीडित महिलेची थेट मागणी

भाजपचे नेते गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांच्यावर एका महिलेनं लिव्ह इन रिलेशनशिपचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. आता ही पीडित महिला समोर आली असून आमची डीएनए चाचणी करावी, कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही, माझ्या मुलाला वडिलांचे नाव मिळावे, अशी मागणी पीडितेनं केली आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे आमदार गणेश नाईक चांगलेच अडचणीत सापडले आहे. ज्या पीडितेनं नाईकांवर आरोप केला. त्या महिलेनं आता समोर येऊन आपली भूमिका मांडली.

‘माझ्यावर अत्याचार झालाय, माझं शोषण झालंय, मला टॉर्चर केलं गेलंय अशी उद्विग्न प्रतिक्रिया गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने व्यक्त केली आहे. डीएनए टेस्ट केल्याशिवाय याचा निर्णय लागू शकत नाही. त्यामुळे आमची डीएनए टेस्ट करावी. जिथे जिथे मला मदत भेटेल तिथे तिथे मी जाणार असून मला कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नसल्याचेही पीडित महिलेनं स्पष्ट केलं.

‘आमच्यावर सुरुवातीपासून भेदभाव होत आलाय, कुठेही आमचा स्वीकार केला गेला नाही, आम्हाला लपवून ठेवलं गेलं. नाईकांची माझ्या मुला विषयी कोणतीही प्रेमाची भावना देखील नाही. अशी प्रतिक्रिया देखील पीडित महिलेने व्यक्त केलीय. यासोबतच मला पैश्याचा मोह नसून फक्त मुलाला वडिलांचे नाव मिळावं हीच अपेक्षा असल्याचे या महिलेनं स्पष्ट केलंय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *