राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देणार का

औरंगाबादमध्ये पोलिसांनी जमावबंदी लागू केल्याने मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या १ मे रोजीच्या सभेबाबत अनिश्चिततेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी विचारणा केली असता त्यांनी ठोसपणे काहीही बोलण्याचे टाळले. मनसेच्या (MNS) सभेला परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय एक-दोन दिवसांत घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले. (HM Dilip Walse Patil on Raj Thackeray Aurangabad Rally)

औरंगाबादचे पोलीस आयुक्त याबाबत त्यांचे सहकारी आणि पोलीस महासंचालकांशी चर्चा करत आहेत. सगळी परिस्थिती पाहून याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. कालच भोंग्यांबाबत सर्वपक्षीय बैठक झाली. त्यावेळी चर्चा झाली. यानंतरही राज ठाकरे (Raj Thackeray) यांना जाहीर सभा घ्यायची असेल तर आता त्याबाबतचा निर्णय औरंगाबादचे पोलीस आयु्क्तच घेतील. यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नसल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र, राज्यात कोणीही कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई होणारच, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

औरंगाबाद शहरात १३ दिवसांची जमावंदी आणि शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार २६ एप्रिल ते ९ मे या काळात औरंगाबादमध्ये शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू असेल. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली. पोलिसांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) १ मे रोजीची सभा पुढे ढकलणार का, हे पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *