महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या राजकीय भाषणावर निर्बंध

राज्यातील सध्याच्या राजकीय गदारोळाच्या पार्श्‍वभूमीवर आज राज्य सरकारने महाराष्ट्रदिनाच्या सोहळ्याची रूपरेषा स्पष्ट केली आहे. त्यानुसार पालकमंत्र्यांनी कोणतेही राजकीय भाषण करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या भाषणाचा आशय ऐतिहासिक पार्श्‍वभूमी, ऐतिहासिक मान्यवरांचे कार्य आणि कर्तृत्व या पुरते मर्यादित असेल. बलिदान केलेल्या हुतात्म्यांचा आणि देशाचा गौरव याचाही भाषणात सरकारला समावेश अपेक्षित आहे.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त एक मेस सकाळी सातला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि इतर हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर सकाळी आठला शिवाजी पार्कमध्ये ध्वजारोहण आणि संचलन होईल. तसेच सकाळी आठला विभागीय, जिल्हा, उपविभागीय व तहसिल मुख्यालयासह इतर ठिकाणी सकाळी आठला ध्वजारोहण आणि संयुक्त संचलन होईल. त्यामुळे सकाळी सव्वासात ते नऊ या वेळेत ध्वजारोहणाचा अथवा इतर कोणताही सरकारी अथवा निमसरकारी कार्यक्रम होणार नाही. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचे ध्वजारोहण करायचे असल्यास अशांनी सकाळी सव्वासात पूर्वी अथवा नऊ नंतर करायचे आहे. विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्री, तालुक्याच्या ठिकाणी विधानसभा अथवा विधानपरिषद सदस्य ध्वजारोहण करतील. महाराष्ट्रदिनी राज्यात सर्वत्र व खेड्यातील सार्वजनिक आणि सरकारी इमारतींवर आणि रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सीताबर्डी, चंद्रपूर अशा ऐतिहासिक ठिकाणी राष्ट्रध्वज उभारायचा आहे. सूर्यास्तास राष्ट्रध्वज उतरवण्यात येईल.
० कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करू नये
० स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नी व आई-वडिलांना आणि कोरोना योद्ध्यांना निमंत्रित करावे
० कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक अंतर राखून नियमांचे पालन करावे
० राष्ट्रध्वजाला वंदन करताना ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत वाजविण्यात यावे
० कोणत्याही अधिकाऱ्यांनी भाषण करू नये
० सलामीवेळी सज्ज असलेला बँड सलामीपूर्वी आणि सलामीनंतर वाजवावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *