“जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून…” – राजू शेट्टी

शिक्षण सम्राटांनी केलेल्या फी वाढीमुळे गरीबांच्या मुलांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. शासनाच्या (government) चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेले शेतकऱ्यांचे प्रश्न, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाईने जनतेचे कंबरड मोडले आहे. जनतेच्या या जिव्हाळयाच्या या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी भोंगे, हिजाब, हनुमान चालिसा व हिंदू-मुस्लिम या सारखे वाद निर्माण केले जात असून याला राज्य व केंद्र जबाबदार असल्याची खरमरीत टीका माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी राज्यात बळीराजा हुंकार यात्रा काढण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रा संपून मराठवाडा, विदर्भ दौर्‍यावर रेल्वेने जात असताना ते बोलत होते. याप्रसंगी संघटनेचे राजाभाऊ कदम, सागर सूर्यवंशी व प्रवीण परदेशी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास राज्य व केंद्र सरकार (government) दुर्लक्ष करीत आहे. सरकारचे वाढते भारनियमन, महागाई, शेतीसाठी दिवसा वीज, खतं, डिझेल, पेट्रोल व गॅसच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे जनतेचे जगणं अवघड झाले आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न स्वाभिमानी मांडत असल्याने हुंकार यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनतेचे जगण्यासाठीच्या जिव्हाळयांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी समाजात द्वेष निर्माण करणारे भोंगे, हनुमान चालिसा, हिजाब व हिंदू-मुस्लिम मुद्दे पुढे केले जात आहेत.

ऊस एफआरपीचे तुकडे करण्यास राज्य व केंद्र ही दोन्ही सरकारे जबाबदार आहेत. राज्यात गळपाविना ऊस शिल्लक राहणे हे सरकारचे अपयश आहे. राज ठाकरेंच्या मराठवाडयातील औरंगाबाद येथील सभा व हुंकार यात्रेबाबत विचारले असता आम्ही शेतकरी व जनतेचे प्रश्न मांडत असून आमचे पाय जमीनीवर आहेत. त्यामुळे कोणी काय करावे हा त्यांचा प्रश्न असल्याचे मतं शेट्टी यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *