मुख्यमंत्रीपद मिळाल्याने उद्धव ठाकरेंचे अच्छे दिन

भाजपने ओबीसी आरक्षणाचा खून केल्याची टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. या टीकेला भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांनी उत्तर दिलं आहे. जे राज्य सरकार २ वर्षात इम्पेरीकल डाटा देऊ शकलं नाही, ते सात महिन्यात कसं देणार, असा सवाल करत रावसाहेब दानवे यांनी छगन भुजबळ यांच्यासह राज्य सरकारला टोला लगावला. राज्य सरकारमधील सर्व ओबीसी मंत्री हे शोभेच्या वस्तू आहेत. ओबीसींवर अन्याय करणं हे राज्य सरकारचं धोरण असल्याचं देखील दानवे यांनी म्हटलं आहे.

‘रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ मार्फत महिला बचत गटाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सॅनेटरी पॅड्सच्या युनीटचं उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जालन्यातील राजूर या ठिकाणी झालं. यावेळी आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अच्छे दिन आले नसल्याचं म्हटलं होतं. यावरून दानवे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सरकार आपल्याशिवाय येत नाही हे लक्षात येताच शिवसेनेने बगावत केली, धोका दिला. असंगाशी संगत केली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले. उद्धव ठाकरेंचे अच्छे दिन आले. भाजपला धोका देऊन यांचेच अच्छे दिन आले. पण यामुळे राज्यातील १२ कोटी जनतेला त्यांनी बुरे दिन आणले, असा जोरदार टोला दानवे यांनी लगावला. जो मुख्यमंत्री मंत्रालयात २ वर्ष जात नाही. त्यांच्यासाठी हे अच्छे दिन आहेत. पण जनतेसाठी बुरे दिन असल्याचं दानवे म्हणाले.

भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपने पुढे केल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली. यालाही दानवे यांनी उत्तर दिलं. आम्ही राज ठाकरे यांना पुढे आणलं नाही. ते फक्त भाजपच्या बाजूने बोलले. याशिवाय भाजपचं कर्तृत्व पाहून राज ठाकरे आमच्या बाजूने बोलले. राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यासाठी रेल्वे गाड्या मागितल्या होत्या. त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट झाली होती, असंही दानवे यांनी सांगितलं. याशिवाय या भेटीत कोणतीही राजकिय चर्चा झाली नाही, असंही ते म्हणाले.

मी ब्राम्हण मुख्यमंत्री पाहू इच्छितो, या वक्तव्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. जालन्यातील त्या कार्यक्रमात माझ्या आधीच्या वक्त्याने जालना पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त वार्डात ब्राह्मणांना तिकिटं द्या, अशी मागणी केली होती. म्हणून आपण ते वक्तव्य केल्याचं दानवे म्हणाले. देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले असते, पण दगाफटका झाला. आता धोका देणाऱ्यांना निवडणुकीत लोक जागा दाखवतील, असा इशारा दानवे यांनी शिवसेनेला दिला.

भाजप आम्हाला दगाफटका देत असेल तर आमही त्यांचा कोथळा काढू, असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय. यावर देखील दानवे यांनी भाष्य केलं. शिवसेनेच्या एका मुख्यमंत्री पदासाठी पक्षातील सर्व आमदार, खासदार नाराज आहेत. हे काय आमचे कोथळे काढणार. निवडणुकीत आम्हीच यांचे कोथळे काढू, असं प्रत्युत्तर दानवे यांनी संजय राऊत यांना दिलं. आम्ही आता कोणताही पक्ष फोडाफोडीच्या नादाला लागलेलो नाही. २०२४ च्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर सत्ता आणणार, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *