अतिरिक्त ऊसाचा पहिला बळी, नैराश्येत शेतकऱ्याने घेतला गळफास

बीड जिल्ह्यात (Beed district) अतिरिक्त ऊसाचा (Sugarcane) प्रश्न पेटला असून जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा पहिला बळी गेला आहे. तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने, 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने चक्क ऊस पेटवून दिला. इतकेच नाही तर त्यानंतर ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन या शेतकऱ्याने आत्महत्या (farmer hang self in Beed) केली आहे. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना, बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगाव (Hingangaon Gevrai Taluka Beed) मध्ये घडली आहे.

नामदेव आसाराम जाधव रा. हिंगणगाव ता. गेवराई जि. बीड असं गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. नामदेव जाधव यांना एकूण 2 एकर शेती असून त्यांनी शेतामध्ये 265 जातीचा ऊस लागवड केला होता. त्यासाठी त्यांना एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च आला होता. मात्र हा ऊस आता तोडणीला येऊन देखील, परिसरातील एकही कारखाना तो ऊस घेऊन जात नव्हता.गेल्या अनेक दिवसांपासून ऊस घेऊन जाण्यासाठी, नामदेव जाधव हे कारखान्याकडे चकरा मारत होते. मात्र त्यांना कारखान्याकडून निराशाच मिळाली, यामुळे नैराश्यात आलेल्या आसाराम जाधव यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी ऊसाच्या फडाला पेटवून देत, फडातिलचं लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे.दरम्यान बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर बनला असून जवळपास 30 ते 40 हजार मेट्रिक टन ऊस अद्यापही बीड जिल्हा शिल्लक असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे एकीकडे अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असताना देखील कारखानदार मात्र मनमानीपणा करत आहेत. परजिल्ह्यातील ऊस आयात करत आहेत. यामुळे तळहाताच्या फोडा सारखा जपलेला ऊस कुठे घालावा ? असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढं उभा ठाकलाय.त्यामुळे आता संतप्त आणि हताश झालेल्या शेतकऱ्यांकडून, टोकाचं पाऊल उचललं जात असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात निर्माण झालंय. त्यामुळे आता साखर आयुक्त आणि सरकारने यावर तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी दिली आहे. तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांचा ऊस गाळपाला सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *