मुंबईच्या उंबरठ्यावर करोनाचं संकट
करोनाच्या जीवघेण्या संसर्गातून आता कुठे सुटकेचा श्वास घेतला असताना आता नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, ठाण्यामध्ये पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यामध्ये ३० नवे करोनाचे रुग्ण आढळून आले आहे. ज्यामध्ये एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ७,०९,४१० आहे.
बुधवारी एका अधिकाऱ्याने यासंबंधी माहिती दिली. करोनाचे निर्बंध उठल्यापासून सगळं काही आधीसारखं सुरू आहे. अशात लोकांनी मास्क वापरणेही बंद केले आहे. पण त्यामुळे कदाचित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्याचं बोललं जात आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या ११,८९५ वर स्थिर असून आदल्या दिवशी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर ठाण्यातील कोव्हिड-१९ चा मृत्यू दर १.६७ टक्के आहे.
अधिक माहितीनुसार, ठाण्याचे शेजारील शहर पालघरमध्ये करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १,६३,६१२ आणि मृतांची संख्या ३,४०७ इतकी आहे. दरम्यान, करोनाचे निर्बंध उठवल्यानंतर नागरिक आता बिनधास्त फिरत आहेत. पण मास्क वापरणे सोडू नका अशा सूचना देण्यात येत आहेत. कारण, यामुळे कुठल्याही संसर्गाला रोखणं प्राथमिकरित्या शक्य आहे.