चहा पावडरमध्ये रसायनाची भेसळ
चहा पावडरमध्ये सुगंधी रसायन पावडरची (Scented Chemical Powder) भेसळ करून शहरातल्या विविध किरकोळ विक्रेत्यांना त्याचा पुरवठा केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी शिवडी (Sewaree) भागातल्या झोपडपट्टीतून (Slum) दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून भेसळयुक्त चहा पावडरचा 85 हजार रुपये किमतीचा तब्बल 430 किलो साठा जप्त केला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
खाद्यपदार्थांत भेसळ (Adulteration) करण्याचे उद्योग अलीकडे वाढत चालले आहेत. पैसे कमावण्यासाठी लोकांच्या जिवाशी खेळण्याचे हे प्रकार आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असते. शिवडी भागातल्या रामगड (Ramgad Slum) झोपडपट्टीतल्या एका गोडाउनमध्ये चहा पावडरमध्ये भेसळ करण्याचं काम सुरू असल्याची खबर मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी 14 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तिथे धाड टाकली. 26 वर्षांचा राहुल शेख (Rahul Sheikh) आणि 29 वर्षांचा राजू शेख (Raju Sheikh) अशा दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांकडेही चहा पावडर विकण्याचा किंवा साठवण्याचा परवाना नव्हता, असंही उघड झालं आहे. भेसळयुक्त चहा पावडरचा 85 हजार रुपये किमतीचा 430 किलो साठा पोलिसांनी जप्त केला आहे. तसंच, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, ट्रेडर्स चेक बुक, फाइल्स आणि स्टॅम्प पॅड आदी साहित्यही आरोपींकडून जप्त करण्यात आलं आहे.15 मे रोजी या संदर्भातला प्राथमिक माहिती अहवाल अर्थात FIR दाखल करण्यात आला आहे. (Indian Penal Code) भारतीय दंडविधानातलं कलम 328 (विषबाधा), 272 (विक्रीसाठीच्या अन्नधान्यात भेसळ), 273 (भेसळयुक्त अन्नाची विक्री,) 420 (फसवणूक) आदींसह अन्नसुरक्षितता आणि मानके कायद्यातल्या विविध कलमांतर्गत हा FIR दाखल करण्यात आला आहे. अन्नसुरक्षितता कायद्यानुसार (Food Safety Law) उत्पादक, पॅकर्स, होलसेलर्स, वितरक आणि विक्रेते यांपैकी कोणाकडेही भेसळयुक्त, असुरक्षित खाद्यान्नाचा साठा असेल किंवा परवाना न घेता कोणी व्यवसाय करत असेल, तर तो गुन्हा ठरतो.
शिवडी पोलिस स्टेशनमधले वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज सैंद्रे (Manoj Saindre) यांनी या धाडीबद्दल माहिती दिली.
‘शिवडीत करण्यात आलेल्या या कारवाईत पकडण्यात आलेले आरोपी चहा पावडरमध्ये रसायनाची भेसळ करत होते. त्यामुळे त्या चहा पावडरला विशिष्ट गंध आणि स्वाद येत असे. अशी भेसळयुक्त चहा पावडर (Adulterated Tea Powder) साहजिकच ग्राहकांच्या आरोग्याला हानिकारक होती. अन्नसुरक्षितता अधिकाऱ्यांच्या (Food Safety Officer) उपस्थितीत आम्ही या ठिकाणी धाड टाकली,’ अशी माहिती सैंद्रे यांनी दिली.