रतन टाटांच्या साधेपणाला सलाम!
टाटा उद्योग समूहाचे माजी चेअरमन रतन टाटा हे त्याच्या साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जातात. टाटा यांच्या विनम्रता आणि साधेपणाचे अनेक प्रसंग तुम्ही ऐकले असतील. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रतन टाटा कोणत्याही सुरक्षारक्षका शिवाय एका छोट्या गाडीतून प्रवास करताना दिसत आहेत.
एका बाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना महाग आणि लग्जरी गाडी घेण्याची इच्छा असते. दुसऱ्या बाजूला अब्जावधी संपत्ती असलेले रतन टाटा हे नॅनोमधून फिरत आहेत. या व्हिडिओमुळे टाटांबद्दलचा आदर आणखी वाढला असून युझर्स व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.
सुप्रसिद्ध फोटोपत्रकार विरल भियानी यांनी इंस्टाग्रामवर रतन टाटा यांचा ही व्हिडिओ पोस्ट केलाय. व्हिडिओ पोस्ट करताना भियानी म्हणतात, माझे एक फॉलोअर बाबा खान यांनी ताज हॉटेलच्या बाहेर रतन टाटा यांना पाहिले. रतन टाटा यांचा साधेपणा पाहून खान हैराण झाले. कारण त्याच्या सोबत बॉडीगार्ड नव्हता, फक्त हॉटेलमधील कर्मचारी होता आणि रतन टाटा त्यांच्या छोट्या गाडीतून नॅनोमधून आले होते.
रतन टाटा यांनी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्यांनी नॅनोबद्दल सांगितले होते. मी अनेकदा लोकांना कुटुंबासह स्कूटरवरून जाताना पाहिले होते. स्कूटरवर वडील आणि आईसह मुल अडचणीत बसलेले असतात. असे वाटते की सॅडविच आहे. यातून मला प्रेरणा मिळाली आणि मी ठरवले की अशा लोकांसाठी कारची निर्मिती करेन. आर्किटेक्चर शिकल्यामुळे त्याचा फायदा केला आणि रिकाम्या वेळेत डुडल तयार करायचो. रिकाम्या वेळेत माझ्या मनात विचार यायचा की मोटरसायकल अधिक सुरक्षित झाली तर? या विचारातून मी एका कारचे डुडल तयार केले. ते डुडल बग्गी सारखे दिसत होते आणि त्याला दरवाजे देखील नव्हते. त्यानंतर मी ठरवेल की कार निर्मिती करायची. यासर्व विचारानंतर अखेर नॅनो अस्तित्वात आली जी सर्वसामान्य लोकांसाठी होती.
२००८ साली जेव्हा रतन टाटा यांनी नॅनो कार लॉन्च केली तेव्हा संपूर्ण जगाला अश्चर्याचा धक्का बसला होता. फक्त एक लाख रुपयांची किमत असलेली ही गाडी सर्व सामान्य लोकांना परवडणारी होती. २००९ साली नॅनो रस्त्यावर प्रथम दिसली आणि २०१९ पर्यंत ती गायब देखील झाली. भारतीय लोकांनी ही गाडी नाकारली पण टाटांच्या मनात त्याला अजूनही खास स्थान आहे.