राज्यमंत्री बच्चू कडू मध्यरात्री अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले
राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे आपातापामार्गे अकोल्याकडे येत असताना मार्गात एक अपघात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच ताफा थांबून अपघातग्रस्तांना मदत केली व अपघातातील जखमीला तातडीने रुग्णालयात पाठविले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
राज्यमंत्री बच्चू कडू हे दर्यापूरवरुन अकोला मार्गे अहमदनगरकडे निघाले असताना गुरुवारी मध्यरात्री वाटेत आपातापा जवळ त्यांचा ताफा जात असताना त्यांना एक अपघात झाल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच ताफा थांबून ते अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले.
या अपघातात जखमी झालेल्या इरफान चौहाण या वाशीम बायपास गंगानगर येथील रहिवासी युवकाला पालकमंत्र्यांनी मदत करीत त्याला देवकी हॉस्पिटल येथे पाठविले. तातडीने मदत मिळाल्यामुळे या युवकाचे प्राण वाचले. कोणताही प्रोटोकॉल न पाळता केवळ मानवतेच्या नात्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जखमींना मदत केल्याने अपघातग्रस्त युवकाचे प्राण वाचू शकले.
अपघातग्रस्त व त्याच्या त्यांचे नातेवाईकांनी पालकमंत्री बच्चू कडू यांचे आभार मानले. यापूर्वीही अनेक वेळा बच्चू कडू यांनी अपघातग्रस्तांना मदत करू त्यांचे प्राण वाचविले आहेत. कोणताही भेदभाव न करता गरजवंतांच्या मदतीला धावून जाणारे पालकमंत्री बच्चू कडू यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.