विकासकामांना स्थगिती आणण्याचा करंटेपणा करू नये

आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात मंजूर करून आलेल्या कामांना स्थगिती आणण्याचा करंटेपणा करू नये. हा एक प्रकारचा जातिवाद असून, अशा धोरणाचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. त्यांनी विकासकामांशी स्पर्धा करावी, असे आवाहन माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले.माजी मंत्री खडसे यांच्या फार्म हाऊसवर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते उपस्थित होते.

श्री. खडसे यांनी सांगितले, की आमदारांनी विशेषतः माझी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मी २१७ कोटींची कामे मतदारसंघात मंजूर करून आणली आहेत. त्यातील मुलभूत सुविधांसाठी दहा कोटी रुपये, मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी पाच कोटी, मुक्ताईनगर व बोदवड नगरपंचायतींतर्गत अल्पसंख्याकाच्या शादीखाना हॉलसाठी प्रत्येकी एक कोटी, दलित वस्ती सुधारण्यासाठी दोन कोटी २० लाख, मुक्ताईनगर ते पिंपरी अकराऊत रस्त्यासाठी दोन कोटी ६७ लाख, कुंड धरणासाठी दीड कोटी, बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी १०० कोटी, कुऱ्हा- वडोदा उपसा सिंचन योजनेसाठी ५० लाख, वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेसाठी २५ लाख, मुक्ताई मंदिराचा जीर्णोद्धार व वॉटर पार्कसाठी प्रत्येकी पाच- पाच कोटी, अल्पसंख्याक तंत्रनिकेतन महाविद्यालयासाठी चार कोटी व मुक्ताईनगर व बोदवड नगरपंचायतींतर्गत मागासवर्गीयांसाठी संविधान सभागृहासाठी दोन कोटी ४८ लाख रुपये मंजूर केले होते. यात लायब्ररी, वाय-फाय सुविधेसह इतरही सुविधा होत्या. एकूण २१७ कोटींची कामे आपण मंजूर केली होती. यात तेली व लेवा पाटील समाजासाठी प्रत्येकी ५० लाख, बंजारा समाजासाठी मोरझिरा येथे १५ लाख एवढेच नव्हे, तर मागासवर्गीय, अल्पसंख्याकासह विविध समाजाचा या विकास निधीमध्ये समावेश असताना, आमदारांनी त्याला स्थगिती आणण्याचा करंटेपणा केला. हा एक प्रकारचा जातिवाद असल्याचा आरोप श्री. खडसे यांनी केला. एकीकडे गिरीश महाजन शिवसेनेला गटारातील बेडकाची उपमा देतात आणि दुसरीकडे आमदार त्यांचा सत्कार करतात, असाही आरोप त्यांनी केला.आमदार चंद्रकांत पाटील आपण शिवसेनेचे आमदार आहोत, असे जाहीरपणे सांगतात. त्यांना माझे आव्हान आहे, की त्यांनी विधीमंडळ किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे साध्या दोन ओळींचे पत्र लिहून ‘मी शिवसेनेचा आमदार आहे’, असे सांगावे. स्पर्धा विकासाची करा. मी २०० कोटी आणले. तुम्ही ५०० कोटी आणून दाखवा. मतदारसंघात अधिकारी यायला तयार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मी पाच पूल करून दाखविले. तुम्ही किमान शेमळदा येथे तापी नदीवरील तुम्हीच आश्वासन दिलेला एक पूल करून दाखवावा, असे आव्हानही माजी मंत्री खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *