संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी शिवसेना आमदारांकडे जोरदार लॉबिंग

:संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेवर निवडून आणण्यासाठी मराठा संघटनांकडून सध्या पडद्यामागे प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून सध्या संभाजीराजे समर्थक (Sambhajiraje chhatrapati) आणि मराठा संघटनांचे पदाधिकारी शिवसेनेतील (Shivsena) मराठा आमदारांच्या माध्यमातून लॉबिंग करत असल्याची चर्चा आहे. संभाजीराजे यांना अपक्ष म्हणून पाठिंबा देण्यास नकार दिल्याचा सेनेला राजकीय फटका बसेल, असे हे समर्थक सांगत आहेत. मराठा समाज सेनेच्या विरोधात जाऊ शकतो, अशी मांडणी हे कार्यकर्ते करत आहेत. त्यासाठी सेनेतील मराठा नेत्यांना, आमदारांना भेटून ते भूमिका मांडत आहेत. त्यामुळे आता मराठा संघटनांची ही शिष्टाई फळाला येणार का, हे आता पाहावे लागेल. (RajyaSabha Election 2022)

संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेच्या गोटातून पाठिंबा; आमदारांकडून मातोश्रीला धोक्याचा इशारा?

संभाजीराजे समर्थकांनी नुकतीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. कोणत्याही अटी, शर्ती न ठेवता संभाजी राजे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती.यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, याबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम राहील, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली होती. राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी शिवसेना कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. मग तो कोणी असो. राज्यसभेच्या दोन जागांवर शिवसेनेचेच उमेदवार उभे राहतील आणि निवडून जातील, असे संजय राऊत यांनी सांगितले होते. आम्ही संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास सांगितले. आम्ही एक पाऊल पुढे टाकले होते. संभाजीराजे छत्रपती यांनीही एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे होते.आमचा कोणालाही विरोध नाही. पण राज्यसभेच्या दोन जागांवर कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचेच दोन उमेदवार निवडून जातील. ही गोष्ट मी उद्धव ठाकरे यांच्यावतीने सांगत आहे, माझ्या मनातलं काहीतरी सांगत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *