“बातम्यांद्वारे वस्तुस्थिती पुढे यावी” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता, माहिती व जनसंपर्क विभागाचे ‘माहिती भवन’ प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी मंगळवारी व्यक्त केला. बातम्यांद्वारे वेळोवेळी वस्तुस्थिती नागरिकांपुढे मांडण्याबरोबरच चुकीच्या बातम्यांचे खुलासे होणे आवश्यक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

नवी मुंबईतील नेरूळ येथे माहिती भवन इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि सिडको यांच्यात मुख्यमंत्री ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव दीपक कपूर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्यात सामंजस्य कराराचे हस्तांतरण करण्यात आले.

‘पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये बराच बदल झाला असून, खिळ्यांच्या ब्लॉकच्या टाइपसेटिंगपासून मोबाइलपर्यंतचा पत्रकारितेचा प्रवास थक्क करणारा आहे. आता एका क्षणात जगभरात माहिती पाठवता येते आणि हे काम करण्यासाठी पत्रकारांना एका ठिकाणी बसता यावे, याकरिता माहितीभवन निश्चितच उपयुक्त ठरेल. चुकीच्या माहितीवर आधारित अनेक बातम्या प्रसारित किंवा प्रसिद्ध होत असतात. त्यांमधील वस्तुस्थिती वेळोवेळी नागरिकांसमोर मांडण्याबरोबरच चुकीच्या बातम्यांचे खुलासे होणे आवश्यक आहे,’ असेही ते म्हणाले.

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते. राज्यमंत्री तटकरे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजाचे कौतुक केले. माहिती भवनामध्ये पत्रकार संघटनांच्या कार्यक्रमांबरोबरच महासंचालनालयाकडे असलेल्या ग्रंथांचे डिजिटायझेशन करून डिजिटल ग्रंथालय लवकरच सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दीपक कपूर यांनी माहिती भवनसाठी केलेल्या सहकार्याबद्दल नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, तसेच राज्यमंत्री तटकरे यांचे आभार मानले. माहिती भवनामध्ये माध्यम प्रतिसाद केंद्र, डिजिटल ग्रंथालय, माध्यम प्रशिक्षण केंद्र आणि पत्रकार कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास संचालक दयानंद कांबळे, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलूरकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *