राणा दाम्पत्यामुळे बिल्डिंगमधील सगळेच फ्लॅटधारक गोत्यात; पालिकेची नोटीस

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या मालकीचा फ्लॅट असलेल्या इमारतीमधील सगळ्यांनाच मुंबई महापालिकेनं नोटीस पाठवली आहे. उपनगरातील खार येथे राणा दाम्पत्याचा फ्लॅट आहे. याच फ्लॅटमधून मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेतलं होतं. या फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्यानं मुंबई महापालिकेनं राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. त्याविरोधात राणांनी दिंडोशी न्यायालयात धाव घेतली होती.

राजकीय सूडबुद्धीतून नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप नवनीत राणा आणि रवी राणांनी केला होता. त्यानंतर पालिकेला इमारतीमधील आणखी फ्लॅट्सधारकांबद्दलही तक्रारी मिळाल्या. त्यानंतर आता महापालिकेनं इमारतीमधील सर्वच फ्लॅटधारकांना नोटीस बजावली आहे. सगळ्याच फ्लॅट्सचं ऑडिट पालिकेकडून केलं जाणार आहे. त्यामुळे राणांसोबतच इमारतीमधील सगळ्याच रहिवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत.

राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून दिलासा
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना दोनच दिवसांपूर्वी न्यायालयानं दिलासा दिला. खार येथील घरासंदर्भात दिंडोशी न्यायालयाकडून राणा दाम्पत्याला अर्ज करण्यास १ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तसंच पुढील आदेशापर्यंत कारवाई न करण्याच्या सूचनाही न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिल्या आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई महानगरपालिकेने खार येथील घराचं अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या दोघांनीही न्यायालयात धाव घेतली. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आता राणा दाम्पत्याला एक महिन्याची मुदत दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
राणा दाम्पत्याचे मुंबईतील खार येथे घर असून ज्या इमारतीत हे घर आहे त्या इमारतीबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. इमारतीतील अनेक सदनिकांमध्ये मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त अधिकचे बांधकाम करून पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आलं आहे, अशा तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार अनेक सदनिकाधारकांना नोटीस पाठवल्या आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या पथकाने याबाबत तपासणी केली.

अवैध बांधकामाबाबत कारणे दाखवा नोटिशीला राणा दाम्पत्याने दिलेलं उत्तर अमान्य करत ७ ते १५ दिवसांमध्ये अनधिकृत बांधकाम हटवा, अन्यथा आम्हाला याबाबत कारवाई करावी लागेल, असा इशाराही महापालिकेकडून देण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *