वस्त्रनगरीला महापुराची धास्ती!

पावसाच्या आगमनाची सुरू झाली की, इचलकरंजीतील गावभागासह चंदूर, इंगळी, रुई या पंचगंगा नदी काठावरील गावांच्या उरात धडकी भरते. महापुराचे (flood) पाणी कधी घरात शिरेल याची शाश्वती नसल्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली असतात. येथील नागरिकांची अवस्था वर्षानुवर्षे अशीच आहे.

महापुराच्या काळापुरता लोकप्रतिनिधींना कळवळा येतो. एकदा का पूर ओसरला की, पुढील वर्षीच याची उजळणी होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे इचलकरंजीतील पूरबाधित बहुमजली इमारतीतील 2,265 कुटुंबांना अजूनही जाहीर केलेली मदत मिळलेली नाही. पूरबाधित भागासाठी कायमची उपाययोजना करणे आवश्यक असताना केवळ कागदी मेळ घालून तोंडाला पाने पुसली जात आहेत.

गतवर्षी पंचगंगा नदीला आलेल्या महापुराने इचलकरंजी शहराचे भरून न येणारे नुकसान झाले. शहराची अर्थवाहिनी असलेल्या यंत्रमागाचे तर अतोनात नुकसान झाले. 250 हून अधिक यंत्रमाग कारखान्यांत महापुराचे पाणी शिरले होते. 7,600 कुटुंबांवर स्थलांतर होण्याची वेळ आली. नुकसानीपोटी 10 हजारांचे अनुदान दिले गेले. घरात पाणी शिरलेल्या रहिवाशांना मदत मिळाली; मात्र बहुमजली इमारतीत राहणार्‍या मदतीसाठी पात्र ठरलेल्या 2,265 कुटुंबांना अजूनही मदत मिळालेली नाही. निदान यंदा तरी पुढील तजवीज म्हणून मदत जमा करावी, अशी मागणी लाभार्थी करत आहेत.

20 हजार नागरिकांची झोप उडाली

पूरबाधित क्षेत्रात आजही सुमारे 20 हजार लोकवस्ती आहे. गावभाग, आमराई रोड, मळेभाग, मुजावर पट्टी, लक्ष्मी दड्ड, शिक्षक कॉलनी, पी. बी. पाटील मळा, टाकवडे वेस, जुना चंदूर रोड या परिसराला महापुराचा फटका बसतो. गतवेळच्या महापुराने तब्बल 102 घरांची पडझड झाली होती. परिसरात महापुराच्या (flood) पाण्याने आठ दिवस तळ ठोकला होता; मात्र तुटपुंजी मदत देण्यापलीकडे काहीच झालेले नाही. बँक कागदपत्रातील त्रुटीमुळे 89 लाभार्थी आजही अनुदानापासून वंचित आहेत. व्यावसायिक, उद्योजक, पशुपालक यांना दिलेली मदत अत्यल्प आहे.

पूरबाधित क्षेत्रातील बांधकामांकडे दुर्लक्ष

पूरबाधित क्षेत्र आहे, हे माहीत असूनही नवीन बांधकामे जोरात सुरू आहेत. विशेष म्हणजे, पालिकेकडून अशा बांधकामांना अभय दिले जात आहे. येथील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न वेळीच हाताळला असता, तर अशा बांधकामांना काही प्रमाणात आळा बसू शकला असता. पावसाळा तोंडावर आला की, पालिकेला उपाययोजनांसाठी जाग येते. पालिकेची यंत्रणा कामाला लागते, तरीही महापुराचा धोका निर्माण होऊच नये, यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी ठोस कृती होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *