शरद पवारांनी होळकरांच्या जमिनी ढापल्या

अहिल्यादेवी होळकर यांची आज २९७ वी जयंती आहे. यानिमित्ताने आता पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. गोपीचंद पडळकर हे जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. तेव्हा पडळकर यांनी म्हटले की, १९९३ च्या बॉम्बस्फोटात सहभाग असणाऱ्या आणि शेकडो हिंदूंचा खून करणारे आज सत्तेत बसले आहेत. त्या भ्रष्टाचारी आणि जातीयवादी लोकांनी अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar Jayanti) यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्या जातीयवादी लोकांचे हात अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला लागले होते. त्यामुळे आज आम्ही अहिल्यादेवींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून त्याचे शुद्धीकरण करत असल्याचे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी म्हटले. त्यांच्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावरही तिखट शब्दांत टीका केली. खेड तालुक्यातील वाफगावचा किल्ला आम्ही अनेक वर्षापासून मागत आहोत. मात्र, शरद पवार हे फुकट हा किल्ला वापरत आहेत,होळकरांच्या जमिनी त्यांनी ढापल्या ,काठेवाडी येथील जमिनीचे मिळालेले पैसे होळकरांच्या कुटुंबाला मिळाले नसून हे पैसे सुद्धा ढापले असून होळकरांच्या जमिनीवर यांचाच डोळा असल्याचे आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

अहमदनगरच्या चौंडी येथे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावरही पडळकर यांनी टीकास्त्र सोडले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी या जयंतीचे राजकारण सुरू केले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर आणि झेंडे लावून जयंतीचा कार्यक्रम केला जातोय. तो आम्ही कदापि सहन करणार नसल्याचे गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

चौंडी हे आमचं प्रेरणास्थान आहे. आमच्या चळवळीचे ठिकाण चौंडी आहे. आपला हा समाज नेमका कुठून जागा होतोय हे पवारांना कळलं म्हणून त्यांनी चौंडी ताब्यात घेण्याच षडयंत्र रचलं असून उद्या तिथं दंगल घडविण्याचा प्लॅन शरद पवार आणि रोहित पवार यांनी आखल्याचा आरोपही पडळकर यांनी केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *