गणेशोत्सव काळात प्रसाद कसा असावा? जाणून घ्या शास्त्र!
दोन वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा खुलेपणाने गणेशोत्सव (festival) साजरा होईल. शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. सामाजिक संस्था,संघटनेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुसरीकडे बाप्पाचा नैवेद्य आणि प्रसाद हा सात्त्विक असावा,असे आध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार सांगतात. नागरिकांनी प्रसाद म्हणून तेलकट, तुपकट, तिखट आणि मसाल्याचे पदार्थ टाळावेत, असे आहारतज्ज्ञ सल्ला देतात,हे विशेष.
यंदाच्या निर्बंधमुक्त गणेशोत्सवास बुधवारी प्रारंभ होत आहे. दहा दिवस गणेशोत्सवा दरम्यान धामधूम पाहायला मिळणार आहे. मागील कोरोना संसर्गजन्य परिस्थितीचा गांभिर्याने विचार नागरिकांनी विसरू नये,यासह पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन शासन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठा उत्साह दिसून येत आहे. दुसरीकडे उत्सव साजरा करताना आरोग्याचे भानही जपले पाहिजे असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
गणपती बाप्पाचा नैवेद्य आणि प्रसाद हा सात्त्विक असावा,असे आध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार सांगतात. धार्मिक ग्रंथातील संदर्भानुसार सत्त्व,रज,तम प्रकाराची प्रकृती असते.ज्याप्रकारे अन्न ग्रहण केले जाते, तशी भावना बनते. पुराणकाळापासून गणपती बाप्पाचा प्रसाद आणि नैवेद्य पदार्थ ठरलेले आहेत. उकडीचे मोदक, अनारसे, पुरणाचे मोदक, खवा- सुकामेवाचे मोदक प्राधान्याने असतात. सध्या फास्टफूड आणि इन्स्टंट जमाना असल्याने पेढ्याचा नैवेद्य दाखविताना यात भेसळ आहे की नाही, याची खातरजमा नागरिकांनी केली पाहिजे, असेही डॉ. व्ही.वाय.कुलकर्णी यांनी सांगितले.
असा असावा पौष्टिक,सकस प्रसाद
प्रसादाच्या पदार्थात दुधी भोपळा,डांगर असावे.
पालेभाज्या मिश्रित भात असावा.
पौष्टिक असा मुगाचा शिरा असावा.
मूगडाळ, मोड आलेली मटकी असावी.
तेलकट पुरी ऐवजी पोळी किंवा साधा भात असावा.
प्रसादाचे पदार्थ पचायला हलकेच असावे.
गणपती नैवेद्य..प्रसाद
उकडीचे मोदक
गूळ खोबरे मोदक
पुरणाचे मोदक
सुकामेवा मोदक
खव्याचे मोदक
नारळाच्या वड्या
रवा,बेसन लाडू
सुकामेवा लाडू
पंचखाद्य नैवेद्य, अनारसे नैवेद्य
गूळ पोळी नैवेद्य
मुरड पोळी नैवेद्य
पंचामृत नैवेद्य
सात्त्विक आहाराला पारंपरिक महत्त्व
सात्त्विक आहाराला पारंपारिक महत्त्व आहे.बदलत्या वातावरणात प्रतिकार क्षमता टिकवून राहावी यासाठी सुकामेवा नैवेद्याची पद्धत अनंत काळापासून चालत आलेली आहे. उकडीचे मोदक नैवेद्य दाखवितात याला विशेष महत्त्व असे,की तांदळाच्या पिठाची उकड घेऊन, साजूक तुपाबरोबर तयार केले जातात. यामुळे शरीराला आवश्यक पौष्टिकता यातून मिळते.गणेशोत्सव (festival) दरम्यान दहा दिवस नानाविध प्रकारचे नैवेद्य गणपतीला दाखविले जातात.
गणेशोत्सवात हे पदार्थ टाळावेत
गणेशोत्सवात महाप्रसादाचे वाटप गणेशमंडळाकडून करण्यात येते. शेवटच्या दोन दिवसात भंडारा आयोजित करण्यात येतो. अशा जेवणावळीत मोठ्या प्रमाणावर पुरी-भाजी केली जाते. खरेतर प्रसाद म्हटला,की सात्त्विक आहार पाहिजे. तेलकट,तुपकट,मसाल्याचे पदार्थ टाळावेत. यावेळी सात्त्विक खिचडी,
गणेशोत्सवात खरेतर धार्मिक ग्रंथातील संदर्भानुसार सात्त्विक प्रसाद किंवा नैवेद्य दाखवावा.जसा आहार घेतला जातो,तसा मनावर परिणाम होतो. देवाच्या प्रसादाची सात्त्विकता जपली पाहिजे.
– कृष्णा महाराज जोशी, पुरोहित, जालना
श्रींचा प्रसाद हा सात्त्विक असावा. यात तिखट,तेलकट पदार्थ, मसाल्याचे पदार्थ असू नयेत. अशा पदार्थांचा पचनक्रियेवर परिणाम होत असतो. अनेकदा भेसळीचे पदार्थ नाकारता येऊ शकत नाही.
– डॉ.राज रणधीर, आहारतज्ज्ञ, जालना