जयसिंगपूर परिसरातील जनतेसाठी आनंदाची बातमी
शिरोळ तालुक्यातील अकिवाट, टाकळीवाडी येथे नवीन शासकीय औद्योगिक वसाहत (Industrial estate) होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. जमिनीचा सर्व्हे व कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयाने प्रस्ताव तयार करून मुख्यालयास सादर करणे या प्राथमिक बाबी पूर्ण झाल्या होत्या. याबाबत मंगळवारी मुंबई येथे उद्योगमंत्री तथा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या समवेत बैठक झाली. यात ही औद्योगिक वसाहत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी दिली.
आ. यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्यात अकिवाट- टाकळीवाडीच्या माळभागावर नियोजित शासकीय औद्योगिक वसाहतीची गरज आहे. या ठिकाणी 200 वर उद्योजक नव्याने होणार्या या वसाहतीमध्ये प्लॉट मिळण्यासंदर्भात आग्रही असल्याचे बैठकीत सांगितले. त्यानंतर सध्या उपलब्ध असलेली व कोणतेही अतिक्रमण नसलेली 37 हेक्टर जमीन तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश मंत्री उदय सामंत यांनी बैठकीत अधिकार्यांना दिले.
अतिक्रमण असलेल्या जमिनीबाबत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी तपासून कार्यवाही करावी, याबाबतच्या सूचना दिल्या. नवीन औद्योगिक वसाहत (Industrial estate) उभारण्यासाठी सध्या कोणतीच अडचण नाही. त्यामुळे उपलब्ध जमीन तातडीने ताब्यात घेऊन औद्योगिक वसाहत स्थापण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देशही मंत्री सामंत यांनी दिले.
यावेळी राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे सह. मुख्य कार्यकारी अधिकारी रंगा नायक, औद्योगिक विकास महामंडळाच्या भूसंपादन विभागाचे व्यवस्थापक राजेंद्र गुंडले, उमेश देशमुख जमीन संपादन विषयक अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी भिंगार्डे, प्रांताधिकारी विकास खरात, शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.