राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार पुन्हा अडचणीत
कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार मध्यंतरी अचानक ईडीच्या रडारवर आले होते. त्यामुळे रोहित पवार यांची चांगलीच धावपळ पाहण्यास मिळाली होती. पण, आता रोहित पवार आपल्या साखर कारखान्यामुळे (sugar factory) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आपले काका आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा शब्दच रोहित पवारांनी मोडीत काढला का? अशी चर्चाही रंगली आहे.
रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या इंदापूर युनिटमध्ये उसाच गाळप परवाना नसतानाही सुरू करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत यंदाचा हंगाम हा 15 ॲाक्टोबरपासून सुरू करावा असे निर्देश देण्यात आले होते. त्यासाठी साखर कारखान्यांनी (sugar factory) साखर आयुक्तालयाकडून परवानगी घेणं गरजेच असतं. पण रोहित पवार यांच्या कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामासाठी परवानगी मिळावी असा अर्ज साखर आयुक्तालयाकडे केला आहे, मात्र ती परवानगी देण्यापूर्वीच त्यांनी गाळप सुरू केल्याचा आरोप विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांनी केला आहे.
तसंच कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी असं पत्र साखर आयुक्तांना देत पुरावे म्हणून फोटो व्हिडीओ ही दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात स्थानिक अधिकाऱ्यांना तातडीने पाहणीकरून कारवाई करण्याबाबतचा निर्णय घेण्याच्या सूचना दिल्याच साखर आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
यात महत्वाची बाब म्हणजे, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही ‘कारखान्यांनी शिस्त मोडतां कामा नये’ असं म्हणत योग्य कारवाई करा अशा सूचना दिल्याची चर्चा साखर आयुक्तालयात रंगली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात खासगी कारखान्याच्या स्पर्धेतून काका पुतण्यामध्ये संघर्ष निर्माण झालाय का असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे.