आरोग्याच्या या 6 समस्यांवर लवंग ठरते उपयोगी; जाणून घ्या फायदे
लवंग (clove) हे बीटा-कॅरेटिनचा एक मोठा स्त्रोत आहे, ज्यामुळे त्याला चांगला असा तपकिरी रंग मिळतो. लवंग मध्ये अनेक अँटी-ऑक्सीडेंट्स आणि प्रोव्हिटॅमिन असतात. भारतीय स्वयंपाक घरात लवंगांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्याचप्रमाणे लवंग हे औषधी (medicine) लाभांमुळे (benefits) अतिशय मौल्यवान ठरते. लवंगांमुळे केवळ पदार्थांची चव वाढत नाही तर गळ्यामध्ये खवखव होणे, दातातील वेदना, लठ्ठपणा कमी करणे असे अनेक फायदेही लवंगांच्या वापरामुळे होतात. आरोग्याच्या अनेक समस्याही लवंगांच्या वापरामुळे बऱ्या होतात. अनेक घरगुती उपायांमध्येही लवंगांचा वापर केला जातो. लवंग कोणत्या आरोग्य समस्यांवर उपचार करू शकते हे जाणून घेऊया.
लवंग वापरण्याचे फायदे :
1) दातांतील वेदनांपासून मिळतो आराम
लवंगमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि एनाल्जेसिक (वेदनाशमक) गुणधर्म असतात, जे दातदुखीच्या वेळी येणारी सूज आणि होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करतात. लवंगांचा वापर केवळ वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठीच नव्हे तर त्यामध्ये असणारे अँटी-सेप्टिक गुणधर्म हे दात व हिरड्यांमधील कोणत्याही संसर्गाशी लढण्यास मदत करतात.
कापसाच्या बोळ्यावर थोडेसे लवंग तेल लावून ते वेदना होणाऱ्या दातावर आणि आजूबाजूच्या भागावर लावावे. आपले दात नेहमीप्रमाणे घासून झाल्यानंतर , एक कप गरम पाण्यात 1 ते 2 थेंब लवंग तेल घालावे. आता एक स्वच्छ ब्रश घेऊन तो या पाण्यात बुडवावा व दात पुन्हा एकदा घासावेत. काही वेळा वापर केल्यानंतर फरक दिसून येतो.
2) मळमळणे, उलटी होणे, यापासून मिळतो आराम
लवंगांमध्ये एक सुगंधी आणि सुखकारक गुणधर्म असतो ज्यामुळे मळमळ आणि उलट्या कमी होण्यास मदत होते. गर्भावस्थेदरम्यान होणारी मळमळ कमी करण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. मात्र त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एका स्वच्छ रुमालावर लवंग तेलाचे काही थेंब टाका आणि त्याचा वास घ्या. गरज पडल्यास तुम्ही एक किंवा दोन लवंगा चावून खाऊ शकता.
3) उलटीचा त्रास कमी होण्यासाठी
लवंग कुटून त्याचे चूर्ण करावे व ते मधासोबत सेवन करावे. अथवा गरम पाण्यात लवंग तेल मिसळून, ते पाणी हळूहळू पिऊ शकता.
4) श्वासाची दुर्गंधी कमी करण्यासाठी
लवंग ही नैसर्गिक अँटी-सेप्टिक म्हणून कार्य करते. श्वासाद्वारे दुर्गंध येत असेल तर त्या बॅक्टेरियांना मारण्याचे कार्यही लवंग करते. तुमची टाळू, जीभ आणि घशाच्या वरच्या भागातून कोणतेही बॅक्टेरिआ काढून टाकण्यासही लवंग मदत करते. तसेच लवंगांमध्ये असलेल्या सुगंधी गुणधर्मामुळे ते श्वासाच्या दुर्गंधीशी लढण्यास मदत करू शकतात. लवंगाचे काही तुकडे चावून खाल्यास श्वासाची दुर्गंधी कमी होईल.
5) पचन सुधारण्यास करते मदत
गॅसचा त्रास होत असेल तर तो कमी करण्यास लवंग उपयुक्त ठरते. लवंगांमुळे आपल्या पचन संस्थेमध्ये असणाऱ्या एन्झाईम्सच्या उत्पादनास प्रोत्साहन मिळते व पचनतंत्र सुधारते. रोजच्या जेवणात थोडी कुटलेली लवंग किंवा लवंगांचे चूर्ण यांचा समावेश करावा. अथवा जेवणानंतर रोज एक लवंग चावून खावी.