रविवारी श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज येथे प्रश्नमंजुषा स्पर्धेची दुसरी फेरी
शिरोळ /प्रतिनिधी:
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज व श्री दत्त औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्यावतीने माजी आम. स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त घेण्यात येत असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा या स्पर्धेत शिरोळ तालुक्यातील 3600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील शालेय स्तरावरील विजेत्या स्पर्धकांची स्पर्धेची दुसरी फेरी रविवार दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज येथे होणार आहे, अशी माहिती श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिली.
स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षण मिळावे याकरिता दत्त औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि दत्त पॉलिटेक्निक कॉलेजची निर्मिती केली. या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले भवितव्य घडविले. स्व. सा. रे. पाटील यांच्या 101 व्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ व्हावी या हेतूने स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या स्पर्धेत शिरोळ तालुक्यातील 55 शाळांमधील 3600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धेची प्रथम फेरी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला.
शालेय स्तरावरील विजेत्या स्पर्धकांची स्पर्धेची द्वितीय फेरी रविवारी सकाळी श्री दत्त पॉलीटेक्निक कॉलेज येथे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व माजी आम. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील चषक पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती गणपतराव पाटील यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे व्हॉइस चेअरमन अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, दत्त पॉलिटेक्निक कॉलेजचे संचालक ए. एम. नानिवडेकर, प्राचार्य पी. आर. पाटील, दत्त औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी. बी. पाटील, उपप्राचार्य एन. बी. भोळे, पी. बी. पाटील, विभाग प्रमुख एस. पी. चव्हाण, जे. ए. मुलानी,व ए. टी.पाटील स्पर्धा संयोजक ए. इ. पाटील, डी. बी. होनमोरे उपस्थित होते.