थायरॉईड समस्येकडे दुर्लक्ष करु नका, जाणून घ्या त्याची लक्षणे
थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथी आहेत. त्यांच्या संतुलनाच्या अभावाने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. थायरॉईड (Thyroid) ग्रंथी गळ्याच्या खालच्या भागात तयार होतात. या ग्रंथी शरीरात हार्मोन्स निर्माण करायला फार उपयुक्त असतात. या हार्मोन्स ग्रंथी शरीरातील मेटाबॉलिजम तयार करायला कारणीभूत होतात. शरीरातील व्हिटॅमिनच्या निर्मितीलाही याचा फायदा होत असतो. थायरॉईड ग्रंथी जास्त प्रमाणात ग्रंथी निर्माण करू लागल्या, तर त्याला हायपर थायरॉईड म्हणतात आणि याचं प्रमाण कमी झालं तर हायपोथायरॉईड म्हटलं जातं. ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते. तणावग्रस्त राहणं हे या समस्यांमधील एक प्रमुख लक्षण मानलं जातं. थायरॉईड हा मधुमेह आणि हृदयरोग यांच्यानंतर सगळ्यात जास्त आढळणारा रोग आहे; मात्र याविषयीची जागरुकता जास्त दिसत नाही. कारण, ही लक्षणं वय वाढल्यावर किंवा स्त्रियांच्या बाबतीत रजोनिवृत्तीच्या वेळीच दिसून येतात. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त गांभीर्याने पाहिलं जात नाही; पण वय वाढेल तशी त्याची लक्षणं वाढू लागतात.
थायरॉईड ग्रंथी गळ्याच्या मध्ये असते. त्याची क्षमता कमी झाली किंवा त्याने क्षमतेपेक्षा जास्त ग्रंथी निर्माण करायला सुरुवात केली की, थायरॉईडची लक्षणं दिसू लागतात. थायरॉईड होण्याचं मुख्य कारण आयोडीनची कमतरता हे असलं, तरी ते अनुवंशिकही असू शकतं. याशिवाय थायरॉईड होण्याची अन्यही काही कारणं असू शकतात. थायरायडिस म्हणजे वाढलेल्या थायरॉइड ग्रंथींचा एक समूह असतो.
ज्यामुळे हार्मोन्स निर्माण करण्याची क्षमता कमी होते. सोया उत्पादने जास्त सेवन केल्यामुळे थायरॉईडचा त्रास होऊ शकतो. यात सोया प्रोटीन, कॅप्सूल आणि पावडर यांचा समावेश असतो. काही वेळा औषधांचा साईड इफेक्ट म्हणूनही थायरॉईड होऊ शकतो. पिट्यूटरी ग्रंथी वाढल्यानेही थायरॉईड (Thyroid) होऊ शकतो. कारण, या ग्रंथी हार्मोन उत्पादन करण्याचा संकेत देऊ शकत नाहीत. आहारात आयोडीनची कमतरता हेही त्याचं एक मुख्य कारण आहे. विकीरण थेरपी घेत असल्यास थायरॉईडची समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय मानसिक ताण असणं हीदेखील थायरॉईड निर्माण होण्याचं मुख्य कारण असू शकतं.
पुरुष आणि महिला या दोघांत ही समस्या दिसून येत असली, तरी महिलांमध्ये त्याचं प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त आहे. त्याची काही प्रमुख कारणं अशी आहेत. वजन वाढणं ही एक सामान्य समस्या या काळात दिसून येते. थायरॉईडमुळे मेटाबॉलिजम क्षमता कमी होते. त्यामुळे जो आहार घेतला आहे, त्याचं एनर्जीत रूपांतर न होता फॅटस्मध्ये होतं आणि वजन वाढतं. काही महिलांमध्ये शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. हाता-पायावर हलकी सूज निर्माण होते. अनेकदा हातातल्या बांगड्या किंवा अंगठ्याही कचतात. थकवा जाणवणं हे आणखी एक लक्षण महिलांमध्ये जाणवतं. थायरॉईड अंडरअॅक्टीव्ह होतो तेव्हा थकवा येणं आणि झोप येणं यासारखी लक्षणं दिसून येतात. नखे आणि केस पातळ होणे किंवा गळणे हेही थायरॉईड असल्याचं सगळ्यात आधी दिसून येणारं लक्षण आहे. डोळ्यांच्या समस्या, अनियमित पाळी येणे, डिप्रेशनमध्ये जाणे अशा काही लक्षणांवरूनही थायरॉईड असल्याचं दिसून येतं.
सामान्यत: थायरॉईड असल्याची शंका आली, तर डॉक्टर रक्ताची तपासणी करून घ्यायला सांगतात; पण त्याशिवायही काही तपासण्या केल्या जातात. टीसीएचची (थायरॉईड स्टीम्युलिटिंग हार्मोन) पातळी तपासल्यावर थायरॉईड ग्रंथींची पातळी कमी किंवा जास्त आहे, याची कल्पना येते. त्याचप्रमाणे टी 4 किंवा टी 3 यांच्या प्रमाणावरूनही थायरॉईडचे प्रमाण कळायला मदत होते. न्युक्लिअर थायरॉईड स्कॅन किंवा थायरॉईड अल्ट्रासाऊंड यांच्या मदतीने थायरॉईड ग्रंथींचा आकार, प्रकार आणि संख्या यांचा अंदाज येतो.
थायरॉईड झालेला असेल, तर अशा व्यक्तींनी व्हिटॅमिन, प्रोटीन आणि फायबरयुक्त आहारावर जास्त भर दिला पाहिजे. आयोडीनची मात्रा जास्त असलेले पदार्थही उपयुक्त ठरू शकतात. मासे किंवा समुद्री मासे अशा लोकांच्या द़ृष्टीने फार फायदेशीर असतात. कारण, त्यात आयोडीनचं प्रमाण जास्त असतं. आख्खी धान्य यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यातून जास्त प्रमाणात व्हिटॅमिन, प्रोटीन, मिनरल आणि व्हिटॅमीन बी जातं. जुना तांदूळ, ज्वारी, पास्ता, ब—ेड, पॉपकॉर्न यातून हे घटक मिळतात. दूध आणि दह्यातूनही जास्त प्रमाणात कॅल्शिअम आणि अन्य पोषक तत्त्वे मिळतात. फळे आणि भाज्या हे तर आहाराचा मुख्य स्रोत मानले पाहिजेत. शरीरात अॅन्टिऑक्सिडाईड जाण्यासाठी त्यांची आवश्यकता असते; मात्र या लोकांना आपल्या आहाराचं नियोजन डॉक्टरांना विचारूनच केलं पाहिजे.
थायरॉईडवर उपाय करताना औषधांबरोबरच व्यायाम आणि खाणं यावरही लक्ष द्यायला हवं. योगशास्त्रातील कपालभाती केल्याने थायरॉईडपासून मुक्तता होत असल्याचं दिसून आलं आहे. काही वेळा औषध देऊन थायरॉईड ग्रंथींची संख्या मर्यादित ठेवली जाते; पण तसं होत नसेल, तर ऑपरेशन करून त्या ग्रंथी काढून टाकाव्या लागतात. यात ग्रंथी काढून टाकल्यावर थायरॉईड रिप्लेसमेंट हार्मोन घ्यावे लागतात. ऑपरेशननंतर रेडिओअॅक्टिव्ह आयोडीन घ्यावं लागतं; मात्र वेळीच थायरॉईडचे परीक्षण होऊन त्यावर उपाय करणं कधीही चांगलं. त्यामुळे वरीलपैकी कोणतीही लक्षणं दिसत असल्यास एकदा आपल्या डॉक्टरांना जरुर थायरॉईडची शंका विचारावी.