उन्हाळ्यात वारंवार उद्भवतायंत आजार? मग जेवणात ‘हे’ पदार्थ खाणं टाळा
सध्या उन्हाळा (summer) सुरू आहे. तीव्र उष्म्यामुळे सर्व जण बेजार झाले आहेत. उन्हामुळे अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक समस्या जाणवू शकतात. उन्हामुळे पित्त होणं, त्वचारोग, मळमळ आणि उलट्या होणं हे सर्वसामान्य आहे. यांसारख्या समस्या केवळ उन्हामुळेच उद्भवतात असं नाही. या कालावधीत आहारात काही फळं, भाज्यांचा समावेश असेल तर अशा प्रकारचा त्रास कमी होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहारात काही पदार्थ आणि फळांचा समावेश करणं गरजेचं आहे.
रॅशेस उठणं, खाज सुटणं, त्वचेवर पुरळ येणं, त्वचा लालसर होणं, मळमळणं किंवा कधी तरी उलट्या होणं यांसारख्या समस्या उन्हाळ्यात जास्त प्रमाणात उद्भवतात. अनेकांना असं वाटतं, की हा त्रास जास्त उष्णतेमुळे किंवा उन्हामुळे होत आहे; पण प्रत्येक वेळी हेच कारण नसतं. उन्हाळ्यात काही फळं किंवा भाजीपाला खाल्ल्याने असा त्रास होऊ शकतो. जी फळं किंवा भाज्यांमध्ये लायकोपिन असतं, अशी फळं, भाजीपाल्याचा समावेश आहारात केला, तर या समस्या उद्भवतात. लायकोपिन हा घटक प्रामु्ख्याने टोमॅटो, टरबूज, शतावरी, पपई, किनो, आंबे, गाजर, पेरू आणि टोमॅटो सॉसमध्ये असतो.
उन्हाळ्यात (summer) टोमॅटोसह यापैकी काही फळं किंवा भाज्यांचं सॅलड किंवा ज्यूस करून प्यालं जातं. सॉस तर अनेकांच्या नाश्त्याचा अविभाज्य घटक असतो. ही फळं आणि भाज्यांच्या सेवनाने या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात या गोष्टी योग्य प्रमाणातच आहारात समाविष्ट कराव्यात.
उन्हाळ्यात उन्हामुळे सामान्यपणे त्वचाविकार, मळमळ, डायरिया, पोटदुखी, ब्लड प्रेशर कमी होणं या आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात आरोग्य चांगलं राहावं यासाठी पाणी, थंड पदार्थ आणि रसाळ फळं जास्त प्रमाणात खाणं गरजेचं आहे. तसंच जास्त प्रमाणात गोड किंवा मसालेदार पदार्थ खाणं टाळावं. या ऋतूत फास्ट फूडचं सेवन टाळावं. कारण या पदार्थांमुळे पचनक्रिया बिघडते आणि त्यामुळे त्वचाविकार होण्याची शक्यता असते. याशिवाय लायकोपिनयुक्त पदार्थ टाळावेत. उन्हाळ्यात लायकोपिनयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले, तर त्वचाविकारांसह मळमळ, पोटदुखी, डायरिया, ब्लड प्रेशर कमी होणं यांसारख्या समस्या जाणवू शकतात.
उन्हाळ्यात आरोग्य चांगलं राहावं, शरीर हायड्रेटेड राहावं याकरिता रोजच्या आहारात दही, पनीर, टोफू, दूध, ताक लस्सीसारखे दुग्धजन्य पदार्थ, लिंबू पाणी, नारळपाणी, खरबूज, काकडी, कच्चा कांदा, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. याशिवाय लायकोपिनयुक्त पदार्थांचं सेवन मर्यादित प्रमाणात करावं. यामुळे आरोग्य चांगलं राहील आणि डिहायड्रेशनची समस्या निर्माण होणार नाही.