अलार्म टोन आरोग्यासाठी घातक; नैसर्गिक अलार्मची सवय उत्तम

ज्यांची झोपण्याची आणि उठण्याची कोणतीही निश्चित वेळ नाही असे लोक अलार्म (Alarm) लावून झोपतात. आजकाल, जवळजवळ सर्वच लोक अलार्मच्या आवाजाने जागे होतात; मात्र तुम्हाला माहीत आहे का की, सकाळी लवकर अलार्म टोन ऐकल्यामुळे आरोग्यावर दीर्घकाळ विपरीत परिणाम होऊ शकतो. दिवसाची सुरुवात अलार्मने करणे हा योग्य मार्ग नाही.

याचा शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम होतो. तसेच अलार्मसाठी उशीजवळ मोबाईल ठेवून लोक झोपतात. असे केल्याने रेडिएशनचा धोका असतो. खरे तर सकाळचा सूर्यप्रकाश, पक्ष्यांचा किलबिलाट, कोंबड्याचे आरव हे नैसर्गिक गजर आहेत. त्याचा जास्तीत जास्त वापर करणे केव्हाही श्रेयस्कर ठरू शकते. लॉफबरो युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, झटक्याने उठणे मन आणि शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

बिछान्यावर पहुडल्यानंतर लगेचच झोप येत नाही. या प्रक्रियेला वेळ लागतो. त्याचप्रमाणे झोपेतून जागे होण्यासाठी शरीर आणि मनालाही थोडा वेळ हवा असतो. मात्र, अलार्मचा (Alarm) मोठा आवाज अचानक झोपेत अडथळा आणतो. यामुळे शरीरातील सिरकाडियन प्रक्रियेला त्रास होतो. सिरकाडियन हे शरीराचे नैसर्गिक सूचक आहे आणि ते आपल्याला कधी झोपावे आणि केव्हा जागे व्हावे हे सांगते. झोपेत अचानक अलार्मचा आवाज ऐकू आल्याने कॉर्टिसॉल आणि एड्रेनालाईनसारखे हार्मोन्स वाढतात. त्यामुळे हृदयावर दबाव येऊन तीव्र डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *