तातडीनं निर्णय घेतला नाही तर..; राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

जयसिंगपूर : ऊस दर (Sugarcane Rate) नियंत्रण समितीच्या स्थापनेसह शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानावर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी रविवारच्या जनता दरबारातच मुख्यमंत्र्यांना जाब विचारतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.

या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या वेळी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण समिती न नेमल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. सरकारला आम्ही गेल्या वर्षभरापासून या संदर्भात वेळोवेळी ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करण्याची मागणी केलेली आहे.

‘ऊस दर(Sugarcane Rate) समिती स्थापन न झाल्यामुळे राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी गेल्या दोन हंगामातील अद्याप उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिलेला नाही. शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये साखर कारखानदार बिनव्याजी वापरत आहेत. तसेच सरकारने गेल्या १४ महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम दिलेली नाही. आम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी मागणी केली आहे.’

तातडीने प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यासंदर्भात आदेश व्हावेत. मुख्यमंत्री रविवारी (ता.11) कोल्हापूर जिल्ह्यात जनता दरबार घेत आहेत. आमच्या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्री महोदयांच्या जनता दरबारात हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही जाब विचारू. ’यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील, सागर संभूशेटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *