तुम्ही गरजेपेक्षा जास्त मीठ खाताय का ? वेळीच सावध व्हा
गोड, कडू, तिखट, आंबट, तुरट आणि खारट…. या सहा मुख्य चवी (taste) त्यांचे प्रत्येकाचे पदार्थात आपापले महत्व आहे. त्यांचे प्रमाण थोडे जरी कमी जास्त झाले तर पदार्थांच्या चवीवर त्याचा थेट परिणाम होताना दिसतो. यापैकीच एक चव म्हणजे खारट, ज्यासाठी आपण मीठाचा (salt) वापर करतो. एखाद्या पदार्थात मीठाचे प्रमाण अगदी थोडेसे, चिमुटभरच लागते, पण त्याने संपूर्ण चव बदलते.
मीठाशिवाय आपण जेवणाची कल्पनाही करू शकत नाही. त्याशिवाय अन्नाला काही चव येत नाही, हेही मान्य. पण काही लोकं मीठ इतकं जास्त खातात, की त्यांच्या तब्येतीवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. प्रत्येक पदार्थ प्रमाणात खावा. तो कमी किंवा जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात. मीठाचेही तसेच आहे. मीठाचे अतिसेवन केल्यास शरीर काही संकेत दर्शवू लागते. तुम्हालाही असे संकेत दिसत असतील तर आजच सावध व्हा आणि मीठाचे अतिसेवन सोडा, नाहीतर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. ते संकेत कोणते, हे सविस्तर जाणून घेऊया…
हाय ब्लड प्रेशर
शरीरात सोडिअमचे प्रमाणत जास्त झाल्यास त्या व्यक्तीला हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना करावा लागतो. किडनीद्वारे ब्लड प्रेशरमध्ये हा बदल होताना दिसतो. खूप जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्यास किडनीला द्रव पदार्थांचे उत्सर्जन करणे कठीण होते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे मीठाचे अतिसेवन टाळावे.
हृदयविकार
मीठाचे (salt) अती सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी जेवणात मिठाचे प्रमाण संतुलित ठेवावे. तसेच जास्त खारट पदार्थ खाणे टाळावे.
ब्लोटिंग
मीठाचे सेवन हे शरीरासाठी हानिकारकच असते. जास्त मीठ खाल्याने तुम्हाला सूज येण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. ब ऱ्याच वेळेस असं होतं की जेवल्यानंतर शरीर फुगल्यासारखे वाटते किंवा शरीर जड होते. आपल्या किडनीमध्ये काही प्रमाणात सोडिअम हे असतेच. मात्र अती मीठ खाल्ल्याने जेव्हा शरीरात जास्त सोडिअम मिसळले जाते, तेव्हा भरपाई करण्यासाठी किडनीला जास्त पाणी साठवून ठेवावे लागते. जेव्हा शरीरात मिठाचे प्रमाण जास्त असते तेव्हा पाणी जास्त प्रमाणात जमा होते. याला वॉटर रिटेंशन किंवा फ्लूइड रिटेंशन असे म्हटले जाते.
घसा कोरडा पडणे
जास्त मीठयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने आपला घसा कोरडा पडू लागतो, ज्यामुळे आपल्याला वारंवार तहान लागते.
झोपेत अडथळा येणे
झोपण्यापूर्वी तुम्ही जर जास्त सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन केले असेल तर तुम्हाला लवकर झोप न येणे, नीट , शांत झोप न लागणे असा त्रास होऊ शकते. जेवणात जास्त मीठ खाल्याने अस्वस्थ वाटणे, रात्री वारंवार जाग येणे अशा समस्याही उद्भवू शकतात.
मळमळ
मीठाचे अतिसेवन, जास्त खारट पदार्थ सतत खाणे यामुळे पोटात असंतुलन निर्माण होऊ शकते. यामुळे तुम्हाला मळमळण्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. ही परिस्थिती उद्भवू नये किंवा असा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर जेवणातील मीठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. तसेच, तुमचे शरीर हायड्रेटेड रहावे यासाठी दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणेही गरजेचे आहे.
या चांगल्या सवयींचा अवलंब केल्यामुळे तुमच्या शरीरावरील दुष्परिणाम, तसेच आजारी पडणे टाळता येऊ शकते.