मणिपूरमधील धक्कादायक घटनेनं देशभरात संताप
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील काही पुरुषांनी 2 महिलांना विर्वस्त्र अवस्थेत रस्त्यावरुन फिरवल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांबरोबर या विषयी चर्चा करुन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आदिवासी संघटनेनं केलेल्या दाव्यानुसार या दोन्ही महिलांवर शेतामध्ये काही पुरुषांनी सामुहिक बलात्कार (rape) केला. त्यानंतर या महिलांना नग्नावस्थेत रस्त्यावरुन फिरवण्यात आलं.
पोलिसांची टाळाटाळ
सध्या समोर आलेली ही घटना 4 मे रोजी घडली आहे. राजधानी इम्फाळपासून 35 किलोमीटरवर असलेल्या कांगपोकपाई जिल्ह्यामध्ये ही घटना घडल्याची माहिती ‘इंडेजिनिअर ट्रायबल लिडर्स फोरम’ने (आयटीएलएफ) जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पोलिसांनी मात्र हा दावा फेटाळला असून ही घटना दुसऱ्या जिल्ह्यात घडल्याचं म्हटलं आहे. मात्र या प्रकरणातील एफआयआर कांगपोकपाई जिल्ह्यातच दाखल करण्यात आली आहे.
स्मृती इराणींचा फोन
राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी पोलिसांना या प्रकरणाचा तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सिंह यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच मुख्य सचिवांशीही केंद्रीय महिला बालविकास मंत्र्यांनी चर्चा केली. तातडीने आरोपींवर कारवाई केली जाईल असं आम्ही त्यांना सांगितल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. आरोपींना कायद्यानुसार शिक्षा देण्यासाठी शक्य त्या सर्व गोष्टी करु असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचंही सांगण्यात आळं आहे.
कोणतीही कसर सोडणार नाही
“मणिपूरमधून समोर आलेल्या 2 महिलांच्या लैंगिक अत्याचाराचा भयानक व्हिडिओ निषेधार्ह आणि अत्यंत अमानवीय आहे. मुख्यमंत्र्यांशी बोललणं झालं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्यांची माहिती त्यांनी मला दिली. दोषींवर करावाई करताना सरकार कोणतीही कसर सोडली जाणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली आहे,” असं स्मृती इराणी यांनी ट्वीटरवरुन सांगितलं आहे.
गुन्हा दाखल
मणिपूर पोलिसांनी या प्रकरणामध्ये सामुहिक बलात्काराचा (rape) गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. अपहरण, सामुहिक बलात्कार आणि खूनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमधील परिस्थिती राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने अधिक गांभीर्याने हाताळायला हवी अशी अपेक्षा सर्वसामान्यांनी ट्वीटरवरुन व्यक्त केल्याचं दिसत आहे.