WhatsApp हॅक होण्यापासून कसं वाचवायचं?
व्हाट्सॲप! आता या व्हाट्सॲपचं (WhatsApp) महत्त्व आपल्यासाठी खूप आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि व्हाट्सॲप अशा महत्त्वाच्या यादीत आता हे मोडतं. पण या ऑनलाइन युगात पॉवरफुल काय असेल तर ते ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स नाहीत ते हॅकर्स आहेत. आपलं हॅकर्सकडे लक्ष असायला हवं. जेव्हा एखाद्या ऑनलाइन अकाउंटवर अटॅक होतो तेव्हा आपल्या बऱ्याच गोष्टी धोक्यात येतात. जसं की आपले खाजगी फोटो, बँक डिटेल्स आपल्या जवळच्या व्यक्तींची माहिती अशा अनेक गोष्टी. आजकाल आपल्या सगळ्याच गोष्टी ऑनलाइन असतात त्यामुळे अर्थातच सगळ्याच गोष्टी धोक्यात येतात.
हा स्कॅम नेमका कसा होतो त्याचं एक उदाहरण आम्ही तुम्हाला देतो. 21 जून योग दिवस जेव्हा होता तेव्हा एक घोटाळा उघडकीस आला होता. या दिवशी स्कॅमर्सने योग दिवसाचं निमित्त साधून अनेकांना मेसेज केले आणि योगा प्रोग्रामसाठी जॉईन व्हायला सांगितलं. यासाठी त्यांनी लोकांना एक लिंक पाठवली आणि त्या लिंकवर क्लिक करायला सांगितलं. या लिंकवर जेव्हा क्लिक केलं गेलं तेव्हा युजरला ओटीपी नंबर टाकायला सांगितला. तिने टाकलेला हा ओटीपी व्हाट्सॲप व्हेरिफिकेशनचा कोड होता, हे तिच्या लक्षात आलं नाही. कोड शेअर होताच स्कॅमर्सने व्हाट्सॲपचा ॲक्सेस मिळवला. त्यानंतर युजरच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या लोकांकडे पैशांची मागणी केली. एकदा स्कॅमर्सला जर व्हाट्सॲप (WhatsApp) ॲक्सेस मिळाला तर काहीही होऊ शकतं त्यामुळे आपणच अशा लिंक्स वर क्लिक करण्याआधी काळजी घ्यायला हवी.
व्हाट्सॲप हॅकिंग स्कॅम पासून स्वतःचा बचाव कसा करावा?
संशयास्पद संदेशांपासून सावध राहा: व्हाट्सॲप कोड शेअर करण्याची विनंती करणाऱ्या मेसेजेसपासून सावध राहा, विशेषत: ओळखीच्या कॉन्टॅक्ट्सकडून.
असे मेसेज फॉरवर्ड करणे टाळा: व्हाट्सॲप कोड किंवा संवेदनशील माहिती मागणारे मेसेज आल्यास ते इतरांना फॉरवर्ड करू नका.
संपर्कांशी विनंती ची पडताळणी करा: जर आपल्या व्हाट्सॲप कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणी संवेदनशील माहिती किंवा कोड मागत असेल, जरी ते आपल्या ओळखीचे असले तरीही, फोन कॉल किंवा वैयक्तिक संभाषण करा, त्यांना आधी संपर्क साधा आणि माहिती मागणारी ही तीच व्यक्ती आहे का याची खात्री करून घ्या.
टू-स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल करा: व्हाट्सॲप टू-स्टेप व्हेरिफिकेशन फीचर तुमच्या अकाऊंटमध्ये अतिरिक्त सिक्युरिटी प्रदान करते. व्हाट्सॲप सेटिंग्ज > अकाऊंट > टू स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये जाऊन ते इनेबल करा.
संशयास्पद हालचालींचा अहवाल द्या: जर आपल्याला व्हाट्सॲपवर काही संशयास्पद संदेश, खाती दिसली तर त्वरित कंप्लेंट करा.