राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद; काळम्मावाडी, चांदोलीसह ‘या’ धरणांत किती आहे साठा?

राधानगरी धरण (Radhanagari Dam) क्षेत्र आणि पाणलाट क्षेत्रामध्ये पावसाची तीव्रता कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे काल रात्री बंद झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भोगावती नदीपात्रात होणारा विसर्ग थांबला आहे.

आता केवळ वीजनिर्मितीसाठी १४०० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. परिणामी, पंचगंगा नदीचा पूर ओसरण्यास मदत होईल. मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण (Radhanagari Dam) बघता बघता भरले होते. त्यामुळे सातपैकी पाच स्वयंचलित दरवाजे दोन दिवस खुले होते.

पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिल्याने पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक कमी राहिली. त्यामुळे पाणीपातळी स्थिर झाल्याने रात्री सव्वा आठपर्यंत सर्व दरवाजे बंद होऊन भोगावती नदीतील प्रवाह थांबला आहे. दरम्यान, काळम्मावाडी धरण (Kalammawadi Dam) ६४ टक्के भरले असून १६.२३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

कोयना धरणात ६७.७९ टीएमसी साठा

पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. रात्रीपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ६७.७९ टीएमसी झाला असून, जलाशयात प्रतिसेकंद २९ हजार २५२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ४७ मिलिमीटर, नवजाला ९१ मिलिमीटर व महाबळेश्वरला ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजता पायथा वीजगृहातील दुसरे जनित्र चालवून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यास सुरुवात केली आहे.

चांदोलीत पावसाचा जोर कमी

शिराळा : चांदोली धरण (Chandoli Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून धरण ८५.२५ टक्के भरले असून ११७०९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणात २९.३३टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सायंकाळी चार वाजता धरणाच्या पाण्याची पातळी ६२१.८० मीटर आहे.पाणीसाठा ८३०.४६४

आलमट्टी धरणात ८८.५०३ टीएमसी पाणीसाठा

शुक्रवारी सकाळी आठ वाजता आलमट्टी धरणातील पाणीसाठा ८८.५०३ टीएमसी इतका होता. म्हणजे धरण ७१.०९ टक्के इतके भरले आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक दीड लाख क्युसेकपर्यंत झाल्यानंतर विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *