वादळ पेल्याबाहेर गेलं तर स्वाभिमानीसह तुपकरांना बसणार मोठा फटका

स्वाभिमानीचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या नाराजी नाट्यानंतर स्वाभिमानीतील गटबाजी उघड झाली. पक्षाच्या शिस्तपालन समितीकडून तुपकर यांना १५ ऑगस्टची डेडलाईन दिल्यानंतर तुपकर यांच्यावर कारवाई (action) होणार की समझोता याकडे लक्ष लागले आहे.

स्वाभिमानीची (Swabhimani Shetkari Sanghatana) मुलूखमैदान तोफ अशी ओळख असणाऱ्या तुपकर यांच्यावर ऐन लोकसभेच्या तोंडावर कारवाई करणे स्वाभिमानीसाठी कठीण होणार आहे. स्वाभिमानीची कसोटी आणि तुपकरांची कोंडी अशी काहीशी अवस्था नाराजी नाट्यानंतर निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह शेट्टी (Raju Shetti) यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चांगलीच मशागत केली आहे. अवघ्या आठ-नऊ महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका असतानाच माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेट्टी आपल्या भागातील दौऱ्यात विश्वासात घेत नसल्याच्या कारणावरुन थेट नाराजी व्यक्त करत पुन्हा एकदा संघटनेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले.

यावर शिस्तपालन समितीने निवाडा करण्यासाठी बैठक बोलवली. मात्र, तुपकरांनी बैठकीकडे पाठ फिरवत नाराजीवर शिक्कामोर्तब केले. याचवेळी संघटनेत राहूनच काम करणार असल्याचे सांगत त्यांनी शिस्तपालन समितीलाच कोड्यात टाकले आहे. १५ ऑगस्टपर्यंत तुपकर शिस्तपालन समितीपुढे कसे व्यक्त होणार यावरच पुढील कारवाई (action) की समझोता याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

…तर संघटनेसह तुपकर यांनाही फटका

शेट्टी-तुपकर यांच्यातील मतभेद पेल्यातील वादळ ठरले तर ठीक आहे. मात्र, वादळ पेल्याबाहेर गेले तर स्वाभिमानीसह तुपकर यांनाही काहीसा फटका बसणार आहे. हे ओळखूनच शिस्तपालन समितीकडून यावर पॅचअप करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्वाभिमानी म्हणूनच तुपकर यांची ओळख आहे. तर एक स्टार प्रचारक म्हणून तुपकर यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान शिस्तपालन समितीपुढे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *