रात्री अंघोळ करण्याची सवय चांगली की वाईट?; वाचा तज्ज्ञ काय सांगतात

ऑफिसमधून थकून-भागून आल्यानंतर थकवा व आळस घालवण्यासाठी अनेकजण झोपण्यापूर्वी अंघोळ (bath) करतात. अंघोळ केल्यामुळं दिवसभराचा थकवा, घामाने चिकचिक झालेले अंग यामुळं आराम मिळतो व फ्रेश वाटते. मात्र, रात्री अंघोळ करणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. रात्री आंघोळ करण्याने नुकसान होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

रात्री अंघोळ केल्यानंतर सगळा थकवा निघून जातो व गाढ झोप येते, असं अनेकांचे मत आहे. मात्र, स्लीप एक्स्पर्टनुसार, आपल्या शरीराचे तापमान रात्री कमी असते. ज्यामुळं शरीराला आता झोप हवी, असा सिग्नल दिला जातो. मात्र, जेव्हा आपण अंघोळ करतो तेव्हा शरीराचे तापमान वाढते ज्यामुळं शांत झोप येण्यास अडचणी येतात. व रात्रभर एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर व्यक्ती तळमळत राहतो. इतकंच नव्हे तर रात्री आंघोळ केल्याने आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते, कसं ते पाहूयात.

रात्री अंघोळ (bath) केल्याने रिलॅक्स वाटेल व थवका दूर होईल, असं समजून रोज काही जण अंघोळ करतात. मात्र याउलट सारं घडत असते. रात्री अंघोळ केल्याने झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण गरम पाण्याने अंघोळ केल्यास शरीराचे तापमान वाढते. ज्यामुळं शरीराला चुकीचा संकेत दिला जातो. त्यामुळं गाढ झोप येत नाही. जर तुम्हाला वाटतंय की, अंघोळ केल्याशिवाय झोपू शकत नाही तर झोपायच्या 2 तास आधी कोमट पाण्याने अंघोळ करा.

गरम पाण्याने अंघोळ केल्याने हृदयाची गती तीव्र होते, असं तुम्ही अनेकदा अनुभवलं असेल. गरम पाणी तुमचे रक्तदाब वाढवते त्यामुळं शरीरातील रक्ताचे तापमानही वाढते. याचाच तणाव हृदयावर पडतो आणि हृदयाची गती तीव्र होते. यामुळंच तुमच्या झोपेवरही फरक पडू शकतो.

रात्री जेवल्यानंतर तुम्ही लगेचच गरम पाण्याने अंघोळ केल्यास पाचनसंस्था बिघडू शकते त्यामुळं वजनही वाढण्याची भिती असते. जेवण पचवण्यासाठी रक्त पोटाच्या भागात प्रवाहित होणे गरजेचे आहे. मात्र, जेव्हा तुम्ही अंघोळ करता तेव्हा रक्त शरीरातील सर्व भागार प्रवाहित होते. म्हणूनच जेवल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटांनंतर अंघोळ करणे योग्य ठरेल.

झोपण्यापूर्वी अंघोळ केल्यानंतर केस ओले असतानाच झोपल्याने केसांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. ओले केस ठेवून झोपणे हे तुमच्या आरोग्यासाठी तसेच केसांसाठीही चांगले नाही. उशीवर केस ठेवून झोपल्याने ओलावा शोषला जाईल, ज्यामुळे त्यावर हानिकारक बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता वाढते. यामुळे तुमच्या डोक्यावर आणि टाळूवर खाज, जळजळ आणि कोंडा यासारख्या समस्या उद्भवतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *