स्वयंपाकघरातील बजेट सांभाळणे होणार कठीण; शेतकऱ्यांना होणार फायदा
गणेश चतुर्थीपासून देशात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे, परंतु आता स्वयंपाकघरातील बजेट सांभाळणे कठीण होऊ शकते. कांद्याच्या (onion) वाढत असलेल्या दरामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी येऊ शकते. सरकारने कांद्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले आहे, तरीही कांद्याचे भाव वाढले आहेत. भाववाढीमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
महाराष्ट्रातील कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदी करणारे ५०० हून अधिक व्यापारी संपावर असून, ते कांदा लिलावात सहभागी होत नाहीत. त्यामुळे कांद्याचा पुरवठा विस्कळीत होऊन कांद्याचे दर आणखी वाढण्याची भीती वाढली आहे. नाशिकच्या घाऊक बाजारात कांद्याची खरेदी दोन हजार रुपये असताना सरकारकडून दीड हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विकला जात असल्याचा आरोप व्यापारी करत आहेत. यामुळे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
व्यापाऱ्यांच्या मागण्या
नाफेड आणि एनसीसीएफने देशातील इतर भागातील मंडईंमध्ये कांदा स्वस्तात विकू नये.
कांदा (onion) निर्यातीवर मागील महिन्यात लावण्यात आलेले ४० टक्के निर्यात शुल्क मागे घेण्यात यावे.
टोमॅटो उत्पादकांना सरकारची मदत
२०० रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो घाऊक बाजारात ३ ते १० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात २५ ते ४० रुपये किलोने विकला जात आहे. टोमॅटोच्या वाढत्या उत्पादनामुळे भाव आणखी कमी होतील. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध राज्यांतून १० ते २० कोटी रुपये किमतीचे टोमॅटो खरेदी करू शकते.