धरणांच्या गाळपेर क्षेत्रात केली जाणार चारा लागवड
राज्यातील सर्वच धरणांच्या बुडीत क्षेत्रात (गाळपेरा) चारा (fodder) लागवड केली जाणार आहे. राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे टंचाईसद़ृश परिस्थिती निर्माण होणार आहे, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. चारा निर्मितीसाठी प्रामुख्याने मका, ज्वारीची लागवड केली जाणार आहे.
राज्यात दरवर्षी सरासरी इतका (100 टक्के) पाऊस झाला तरीही आवश्यकतेच्या तुलनेत 44 टक्के चार्याची तूट असते. यावर्षी तर राज्याच्या बहुतांशी ठिकाणी पावसाने सरासरी गाठलेली नाही. यामुळे चार्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासणार आहे. त्याचा परिणाम पशुधनावर आणि दूध संकलनावरही होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्याच्या पीक पाहणी आढावा बैठकीत चारा टंचाईबाबत गांभीर्याने चर्चा झाली. राज्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. सध्या पावसाळा संपत आला आहे. आणखी काही दिवस पाऊस होईल, यामुळे जमिनीत पुरेशी ओल तसेच पाण्याची पातळीही राहणार नाही. यामुळे चारा लागवड करून अपेक्षित चारानिर्मिती होईल, याचीही शक्यता कमीच आहे.
यासर्व पार्श्वभूमीवर पावसाच्या कमी प्रमाणामुळे राज्यातील सर्वच लघू, मध्यम आणि मोठ्या पाटबंधारे प्रकल्प तसेच मृदू व जलसंधारण विभागाकडील प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील पाणी पातळीही कमी होणार आहे. यामुळे धरणक्षेत्रातील मोठ्या प्रमाणात जमिनी मोकळ्या, उघड्या राहणार आहेत, त्या जमिनीत चांगली ओल राहील तसेच धरणातील पाणी सिंचनासाठी उपलब्ध होऊ शकते. यामुळे या जमिनी चारा लागवडीसाठी वापरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. (fodder)
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमपुस्तिका 1978 मधील परिशिष्ट 17 अन्वये गाळपेरा जमिनीचे वाटप फक्त चारा लागवड करण्यासाठी केले जाणार आहे. याकरीता जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीद्वारे लागवडीसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. याकरिता बियाणे वाटपही केले जाणार आहेत. विशेष म्हणजे मुरघास निर्मितीसाठी अशा जागांवर मोठ्या प्रमाणात मका आणि ज्वारीची लागवड करावी, अशी सूचनाही राज्य शासनाने केली आहे.