औषध तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर !

नांदेड व संभाजीनगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांतील रुग्णांच्या मृत्यूच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने रुग्णालयांतील औषध (medicine) तुटवडा दूर करण्यासाठी वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाऐवजी स्थानिक पातळीवर औषध खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आधिपत्याखालील आरोग्य संस्थांसाठी औषधे (medicine) खरेदी करण्याकरिता महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणामार्फत वैद्यकीय वस्तू व औषध खरेदी करणे अनिवार्य आहे. परंतु नांदेड व संभाजीनगर येथील रुग्णालयांत औषध तुटवडा असल्याचे व रुग्णांच्या मृत्यूस ते एक कारण असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची ३ ऑक्टोबरला बैठक झाली. त्यात शासकीय रुग्णालयांतील औषधांच्या तुटवडय़ासंदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार शासकीय रुग्णालयांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून स्थानिक स्तरावर १०० टक्के औषध खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.

राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात गुरुवारी आंदोलन केले. रुग्णालय परिसरात मोर्चा काढण्यात आला, तसेच दिवसभर डॉक्टरांनी काळय़ा फिती लावून काम केले. नांदेड शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांशी पाटील यांच्या गैरवर्तनाबद्दल निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या केंद्रीय मार्डने हे आंदोलन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *